रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! दागिन्यांसह पर्स केली प्रवाशाला परत

दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली प्रवासी महिलेची पर्स अकोल्यातील एका रिक्षाचालकानं परत करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे. (Akola rickshaw driver returns purse full of Jewellery)

0 8

हायलाइट्स:

  • रिक्षाचालकानं परत केली प्रवासी महिलेची पर्स
  • पर्समध्ये होते दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे
  • प्रामाणिक रिक्षाचालकाचा वाहतूक पोलिसांकडून सत्कार

अकोला: मंगळसूत्र, बेसर हे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली एका महिलेची पर्स परत करत अकोल्यातील एका रिक्षाचालकानं प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे. मोहम्मद हानिफ असं रिक्षाचालकाचं नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक पोलिसांनी त्याचा सत्कारही केला आहे. (Akola rickshaw driver returns purse full of Jewellery)

अकोला शहरातील पंचशील नगर येथे राहणारी आरती मंगेश मोरे ही महिला काही कामाने बँक ऑफ महाराष्ट्र येथे गेली होती. तिच्या सोबत तिचा लहान मुलगा सुद्धा होता. तिनं आपला मोबाइल मुलाच्या हातात दिला होता. परंतु काम झाल्यावर घाईघाईने ती बाहेर आली. बाहेर आल्यावर लक्षात आले की मुलाकडून मोबाइल बँकेतच राहिला. तिनं पुन्हा बँकेत जाऊन जाऊन मोबाईलचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही. शेवटी तिनं रिक्षा पकडली आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रार करून घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळाने तिच्या लक्षात आले की पोलिसांकडे जाताना आपली पर्स रिक्षामध्येच राहिली आहे. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, बेसर या दागिन्यांसह तिचे व तिच्या नवऱ्याचे मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड, बँक पास बूक अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. एकाच दिवसात मोबाइल, दागिने व मूळ कागदपत्रे असलेली पर्स अशा वस्तू हरवल्यानं ती भेदरून गेली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. एवढ्यात वाहूतक पोलिसांनी आरती मोरे यांच्याशी संपर्क साधून पर्स आमच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

मोहम्मद हानिफ मोहम्मद इकबाल (रा. सिंधी कॅम्प) याने ही पर्स शहर वाहतूक कार्यालयात जमा केली होती. ही पर्स पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्या उपस्थितीत आरती मोरे यांना परत करण्यात आली. तेव्हा आरती मोरे ह्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. दागिने व महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत करून आपल्या प्रमाणिकतेचा परिचय देणाऱ्या मोहम्मद हानिफचा (ऑटो क्र MH30 BC1333) वाहतूक पोलिसांनी पुष्पगुच्छ व रोख बक्षीस देऊन सत्कार केला.

वाहतूक पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरातील ऑटो चालकांची बैठक घेतली होती. त्यांना मार्गदर्शन करून ऑटोत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चीजवस्तू नजरचुकीने ऑटोत राहिल्यास त्या परत कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं होतं. अशा रिक्षाचालकाचा योग्य सत्कार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्याच्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.