लसीकरण नियोजनाचा बोजवारा:उस्मानाबादेत लसीकरणासाठी 1 किलोमीटर रांग; हजारो लोकांनी गाठले लसीकरण केंद्र, नियोजन फक्त 450 लसींचे

प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्याचा घेतला निर्णय

0 6

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी सकाळी लसीकरण करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दीड ते दोन हजार नागरिक रांगेत असताना जिल्हा रुग्णालयातील या केंद्रात केवळ 450 लसीकरण करण्यात येणार, हे उशीराने सांगण्यात आले. तोपर्यंत नागरिकांचे हाल झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस घेण्यासाठी 14 हजार नागरिकांना प्रतिक्षा लागली असून आजच दुसरा डोस उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रांवर पहाटेपासून गर्दी केली होती.

जिल्हा शासकीय रुग्णालयात साडेचारशे डोस उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र दीड ते दोन हजाराहून अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी रांगेत थांबले. अखेर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रांग गेल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने पोलिस बंदोबस्त मागवला. त्यानंतर केवळ साडेचारशे लोकांना थांबून अन्य लोकांना उद्या येण्यास सांगितले.

यादरम्यान वयोवृद्ध नागरिकांची तारांबळ उडाली, अनेक नागरिक पहाटेपासून रांगेत थांबले होते, असे सांगण्यात आले. प्रशासनाने कोणत्या केंद्रावर किती लसी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, याबद्दलचा तपशील आधीच जाहीर करायला हवा होता.मात्र,तसे न झाल्याने एकाच वेळी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली.

जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचे चौदा हजारावर नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने राज्याच्या कोट्यातून उपलब्ध असलेली ७ हजार लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,उर्वरित नागरिकांचे काय, असाही प्रश्न आहे. त्यामुळे सर्वाना लस मिळणार आहे, गर्दी करू नये,प्रशासनाने जाहीर करणे आवश्यक आहे.

आता टोकन पद्धत, जो सकाळी लवकर येईल त्यालाच मिळेल टोकन
प्रशासनाने यावर तोडगा काढल्याचा दावा केला आहे. जितकी लस उपलब्ध आहे, तेवढ्याच नागरिकांना टोकन देऊन लसीसाठी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जे सकाळी लवकर येतील, त्यांनाच हे टोकन मिळेल. जेवढ्या लस असतील तेवढेच टोकन दिले जातील. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर उद्यापासून हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही, असा दावा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले. यासोबतच, लसीकरणाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुद्धा घेतली जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.