१३ वर्षीय विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टीने केले थक्क! पाहा नेमकं काय केलं?

अकोल्यातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टीनं सर्वांनाच चकित केलं आहे. या मुलानं लॉकडाऊन काळात टाकाऊ वस्तूंपासून स्वयंचलित यंत्रे बनवत सर्वांनाच चकित केलं आहे.

0 10

हायलाइट्स:

  • १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या कल्पकतेचा अविष्कार
  • लॉकडाऊन काळात बनवली स्वयंचलित यंत्रं
  • विधान अग्रवालचं सर्वत्र कौतुक

अकोला: करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांनी आपल्या आवडीनिवडी व छंद जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेकांना आपल्यातील सुप्त गुणांची नव्यानं ओळख झाली. अकोल्यातील १३ वर्षांच्या एका विद्यार्थ्यानं लॉकडाऊनचा सदुपयोग करताना टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त व अप्रतिम यंत्रे बनवली आहेत. त्याच्या या कल्पकतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

विधान सुशीलकुमार अग्रवाल-टेकडीवाल असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो जुन्या आरटीओ परिसरातील रामी हेरिटेज येथे राहतो. जसनागरा पब्लिक स्कूलमध्ये तो सातवीला आहे. लॉकडाऊन काळात घरी बसल्यावर मोबाइलमध्ये वेळ न घालवता विधाननं घरातील अडगळीत पडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी नवे बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू त्याने आश्चर्य वाटावी अशी यंत्रे निर्माण केली. त्याने निर्माण केलेल्या यंत्रांचा पहिला प्रयोग त्यांच्या सोसायटीमध्ये करण्यात आला. ते पाहून सोसायटीतील व परिसरातील नागरिकही चकित झाले.

विधानने घरातील टाकाऊ वस्तूंपासून ऑटोमेटिक सिझर गेम, सेन्सर बसविलेली ऑटोमॅटिक डस्टबिन, सॅनिटायझरने हात धुण्याचे यंत्र निर्माण केले. या यंत्रासमोर हात ठेवताच मशीन सेन्सर अॅक्टिव्ह होऊन हँडवाश बाहेर येतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या तिन्ही मशिन विधाननं तयार केल्या.

करोना महामारीत एकीकडे बहुतेक मुले मोबाइलमध्ये कार्टून व व्हिडिओ गेम खेळण्यात रमली असताना विधाननं आपला वेळ नवनिर्मितीसाठी लावला. विधानला त्याचे आजोबा रमेशचंद्र अग्रवाल टेकडीवाल व आजी प्रमिला अग्रवाल टेकडीवाल यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. आपल्या कौतुकाचं श्रेय तो वडील सुशीलकुमार अग्रवाल व आई सपना अग्रवाल यांना देतो. त्याच्या या वैज्ञानिक दृष्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.