अतिवृष्टीग्रस्तांच्या १३६ कोटींचे होणार वितरण; जिल्हा बँकेतून नियोजन
अतिवृष्टीग्रस्तांच्या १३६ कोटींचे होणार वितरण
नांदेड : जिल्ह्यात मागील पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ५६२ कोटींची भरपाई शासनाने मंजूर केली होती. यातील ७५ टक्क्यांनुसार ४२५ कोटी ३६ लाखांचा निधी वितरित केला. त्यानंतर पाच टक्क्यांनुसार १३६ कोटी प्राप्त झाला होता. हा निधी तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. त्याचे वाटप जिल्हा बॅंकेतून होणार आहे. सरदरची रक्कम जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सात लाख ९० हजार ५३५ शेतकऱ्यांचे खरीप पिकांसह बागायती व फळपिक असे एकूण पाच लाख ६१ हजार ७१९ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाने नवीन दराने मंजूर केलेल्या मदतीनुसार ५६२ कोटी सहा लाखांची मागणी केली होती. यानुसार शासनाने पहिल्या टप्प्यात ७५ टक्क्यानुसार ४२५ कोटी ३४ लाख रुपये निधी ता. तीन नोव्हेंबर २०२१ रोजी तालुक्यांना वितरित केला.
यानंतर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. यानंतर २५ टक्क्यांनुसार शिल्लक भरपाईची प्रतीक्षा होती. दरम्यान, शासनाने उर्वरित १३६ कोटींच्या निधीला मंजुरी देऊन निधी वितरित केला होता. यानुसार जिल्हा प्रशासनाने आठवड्यापूर्वीच तालुक्यांना मागणीनुसार निधीचे वितरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.
”पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ४२५ कोटींपैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ८० टक्के निधीचे वाटप झाले आहे. सध्या वितरित होणाऱ्या निधीही लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येईल.”
– गोविंद मुंगल, कर्मचारी, जिल्हा बॅंक, नांदेड.