जेएसडब्ल्यूच्या बार्जवरून केली 16 खलाशांची सुखरूप सुटका

भारतीय तटरक्षक दल, रायगड पाेलीस, बंदर विभागाचे संयुक्त बचावकार्य

0 6

रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव येथील खाडीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या एम.व्ही. मंगलम बार्जला अपघात झाला. हा मालवाहू बार्ज रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी हि घटना घडली. रायगड पाेलीस, तटरक्षक दलाने बचावकार्य मोहीम राबवत १६ खलाशांची सुखरूप सुटका केली, अशी माहिती रायगडचे अतिरिक्त जिल्हा पाेलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

येथील जेएसडब्ल्यू कंपनीची एम.व्ही. मंगलम बार्ज सुमारे दाेन हजार ४०० मेट्रिक टन आर्यन हा कच्चा माल घेऊन मुंबईहून निघाली हाेती. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीपासून सुमारे दीड किलाेमीटर अंतरावर असताना बार्ज समुद्रातील गाळात रुतून बसली. याबाबतची काेणतीच माहिती यंत्रणेला संबंधित कंपनीने दिली नाही. ओहाेटी सुरू झाल्याने गाळात रुतली. याबाबत रायगड पाेलिसांना माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बचावकार्य हाती घेण्यात आले.

बुधवारी सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी सकाळी साडेदहा असे तब्बल १७ तास खलाशी बार्जवरच अडकून पडले हाेते. बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची दाेन हेलिकाॅप्टर, बाेटी बचाव कार्यात पुढे हाेत्या. १६ खलाशांना हेलिकाॅप्टरच्या, तर तीन खलाशांना बाेटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व खलाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.

सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तटरक्षक दलाचे कॅप्टन अरुण कुमार सिंग, कर्मचारी, प्रादेशिक बंदरचे कॅप्टन चोकेश्वर लेपांडे, बंदर अधीक्षक अलिबाग अरविंद सोनावणे, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

या खलाशांची झाली सुखरूप सुटका कॅप्टन सुदाम देवनाथ, सिरा राजू, मंतव्य राज, संतोष कुमार कटरी, एसके मुस्लर रहमान, मयांक तांडेल, अमित निशाद, मोहम्मद सरफराज, पवन कुमार गुप्ता, मोहम्मद कैफ, समीर विश्वकर्मा, राकेश कुमार गुप्ता, सफात मोहम्मद, मनोज कुमार जैस्वाल, पंकज कुमार पटेल, मिजान एसके.

Leave A Reply

Your email address will not be published.