हिरकणीचा वारसा! १८ महिन्यांच्या उर्वीने आईसोबत फक्त साडे तीन तासात सर केला ‘कळसूबाई शिखर’

१८ महिन्याच्या चिमुरडीला पाठीवर घेऊन महिलेने सर केला ‘कळसूबाई शिखर’

0

महाराष्ट्र वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढीही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला इतिहास आपल्या कृतींमधून जिवंत करत पुन्हा एकदा आपली नोंद घेण्यास ते भाग पाडत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधीने आपल्या १८ महिन्यांच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च शिखर सर करत हे दाखवून दिलं आहे.

फक्त १८ महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुरडीने आपल्या आईसोबत अवघ्या साडेतीन तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलं आहे. अवघ्या साडेतीन तासात उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसूबाईचा अवघड शिखर सर करत जबरदस्त कामगिरी केली.

सोलापुरातील गांधी कुटुंबीय हे शिवविचारांवार श्रद्धा ठेऊन गडकिल्यांच्या भ्रमंतीची मोहीम मागच्या वर्षभरापासून राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज पहाटे शिखर सर करत तिरंगा फडकवला. पहाटे साडे चार वाजता त्यांनी चढाईला सुरुवात केली होती. ८ वाजण्याच्या सुमारास या मायलेकींनी शिखर सर केला होता.

श्रुती गांधी यांना उर्वीचा पहिला वाढदिवस कळसुबाई शिखरावर साजरा करण्याची इच्छा होती. पण करोनामुळे त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण यावेळी मात्र त्यांनी निर्धार केला आणि तो पूर्णही केली. उर्वी आणि तिच्या आईच्या कामगिरीने अनेकांना हिरकणीची आठवण करून दिली आहे. तसंच आपला इतिहास आणि शिवरायांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेशही आपल्या कृतीतून दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.