मेक्सिकोत मेट्रोचा पूल कोसळून २३ जणांचा मृत्यू

मेक्सिको सिटी हे जगातील सर्वात गजबजलेले व वर्दळीचे शहर आहे.

0 15

मेक्सिको सिटी : मेक्सिको सिटी येथे मेट्रोचा पूल सोमवारी रात्री कोसळून झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू ओढवला. ढिगाऱ्याखाली एक मोटार गाडली गेली.

महापौर क्लॉदिया शेनबॉम यांनी सांगितले की, एकूण सत्तर जण जखमी झाले असून ३४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघातात रेल्वेगाडीचे दोन तुकडे झाले. ते पुलावरून लोंबकळत होते.  पुलाच्या ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. हा पूल दक्षिण मेक्सिको सिटी भागात होता. पुलाला आधार देणारा खांबच निखळल्याने ही दुर्घटना झाली. मध्यरात्रीच्या सुमारास लोंबकळणारी रेल्वेगाडी खाली घेण्यात आली. त्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. अजूनही रेल्वेत लोक अडकले असण्याची शक्यता असून ते जिवंत आहेत की नाहीत याची माहिती नाही, असे महापौरांनी म्हटले आहे.

मेक्सिको सिटी हे जगातील सर्वात गजबजलेले व वर्दळीचे शहर आहे. २५ वर्षांपूर्वी तेथे मेट्रो सुरू झाल्यानंतर आतापर्यंत दोन गंभीर अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये दोन रेल्वेगाडय़ांची धडक होऊन टाकुबाया स्थानकाच्या ठिकाणी एक ठार तर ४१ जण जखमी झाले होते. २०१५ मध्ये धावती रेल्वे धडकून १२ जण जखमी झाले होते.

बांधकामात त्रुटी

मेट्रोच्या १२ क्रमांकाच्या लाइनवर हा अपघात झाला असून त्या भागातील बांधकामात अनेक त्रुटी होत्या. मेक्सिकोचे परराष्ट्रमंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी सांगितले, की अतिशय भीषण अशी ही दुर्घटना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.