रत्नागिरी तालुक्यात निराधारांच्या संस्थेतील २४ मुले करोनाबाधित
याचबरोबर, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोघा अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील निराधार मुलांचे पालन करणाऱ्या संस्थेतील तब्बल २४ लहान मुले करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी करोनाची लक्षणे असलेल्या मुलांवर महिला रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. या संस्थेतील सर्व मुलांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्यापैकी काहींना करोनाशी निगडीत लक्षणे आढळून आली. या चाचण्यांमध्ये रविवारी ११ जण, तर सोमवारी झालेल्या चाचणीत १३ जण बाधित सापडले आहेत. लक्षणे असलेल्यांना तत्काळ उपचारासाठी महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याचबरोबर, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोघा अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत बाहेरुन येणाऱ्यांबाबत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या ९३७ करोना चाचण्यांमध्ये एकूण ६४ नवीन बाधित सापडले आहेत. बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या (८४) जास्त आहे. गेल्या आठवडय़ात दररोज कोरोना चाचण्यांची संख्या हजाराहून अधिक होती. सोमवारी त्यात घट झाली असून नव्या बाधितांचा आकडाही कमी झाला आहे. या बाधितांपैकी आरटी—पीसीआर पध्दतीच्या ५१९ चाचण्यांमध्ये फक्त १५ जण, तर अॅण्टीजेनच्या ४०८ चाचण्यांमधून ४९ बाधित आढळून आले आहेत. चिपळूण (२१) व खेड तालुक्यात (१६) सर्वाधिक बाधित सापडले आहेत.सध्या जिल्ह्यात उपचाराखालील बाधितांची एकूण संख्या ५१४ आहे. त्यापैकी ४०४ जण गृह विलगीकरणात, तर उरलेले ११० जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.