गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर केले शेअर; आरोपीला अटक

0 2

गर्लफ्रेंडसोबत फिरायला गेल्यानंतर तरुणाने मोबाईलमध्ये त्या दोघांचे खासगीतील फोटो आणि व्हिडिओ काढले आणि नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले.

अहमदनगर : लग्नास नकार देणाऱ्या युवतीची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियात अश्लील फोटो शेअर करून एक तरुण पुण्याला पळून गेला. मात्र नगरच्या सायबर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. रोहित जालिंदर पाटोळे (वय २४, रा. नगर) असं आरोपीचं नाव आहे. मुख्य म्हणजे त्याचे आधीचे क्रिमिनल रेकॉर्ड असून त्याच्याविरूद्ध मारहाण आणि धमकी दिल्याचा अन्य एक गुन्हा यापूर्वीच दाखल आहे.

भिंगार येथील एका युवतीने १७ मे २०२१ रोजी पाटोळे याच्याविरूद्ध फिर्याद दिली. पाटोळे हा नगर शहरातील सोलापूर रोड भागात राहतो. भिंगारमधील या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मधल्या काळात ते फिरायला बाहेर गेल्यानंतर पाटोळे याने त्याच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे खासगीतील फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर आरोपी पाटोळे युवतीकडे लग्नाची मागणी घालू लागला. मात्र, ती युवती आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला.

याचा राग धरून आरोपी पाटोळे याने त्या युवतीला आणि कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी तर दिलीच, शिवाय त्यांची बदनामी करू लागला. त्यासाठी त्याने त्या युवतीच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट आकाऊंट सुरू केले. त्यावर त्याने पूर्वी केलेले व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले.

ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या युवतीने पोलिस ठाणे गाठले. तेथे आरोपी पाटोळे याच्याविरूद्ध फिर्याद दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी पाटोळेविरूद्ध धमकी दिल्याचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केल्याचाही गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरू केली. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी पाटोळे पुण्यातील येरवडा भागात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. पथकाने पाटोळे याला अटक करून नगरला आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पाटोळे याच्याविरुद्ध भिंगार पोलिस ठाण्यातच पूर्वी एक मारामारी आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.