पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण, अहमदनगरमध्ये गुन्हा

0 7

अश्लील शिवीगाळ करुन गाडीचा दरवाजा उघडून श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला गाडीतून ओढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे.

अहमदनगर : श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आरोपी बाळासाहेब नाहटा यांनी गट विकास अधिकारी प्रशांत दत्तात्रय काळे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Srigonda Panchayat Samiti officer abused and beaten up)

नेमकं काय घडलं?

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीची तपासणी करुन सरपंच अपात्रतेचा प्रस्ताव हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करु नये अशी मागणी आरोपी बाळासाहेब नाहटा यांनी केली होती. मात्र त्यांची मागणी तक्रारदार गट विकास अधिकारी प्रशांत दत्तात्रय काळे यांनी मान्य न केल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला.

नाहटा यांनी अश्लील शिवीगाळ करुन गाडीचा दरवाजा उघडून काळे यांना गाडीतून ओढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये मुख्याध्यापिकेच्या पतीची शिक्षकाला शिवीगाळ

दरम्यान, शाळेत हजेरी का घेतली नाही? या क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापिकेच्या पतीने शिक्षकाला अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मुख्याध्यापिकेचे पती केशव भांगे हे याच शाळेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यातील परळी शहरात ही धक्कादायक घटना घडली होती.

शिक्षक सतीश जाधवांचा आरोप काय?

“16 तारखेला मी घरी येत असताना संस्थाचालकांचे चिरंजीव केशव भांगे यांचा मला फोन आला. त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी मला अर्वाच्च, जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांनी मला आणि कुटुंबाला संपवण्याची भाषा केली. माझी नोकरी घालवण्याचीही धमकी दिली. शाळेत आलास, तर गेटवरच खल्लास करेन, असं धमकावलं. कारण काय, तर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणजे त्यांच्या पत्नीच्या वर्गाची हजेरी का घेतली नाही. तू आमचा गुलाम आहेस, नोकर आहेस, तुला असं वागावंच लागेल, असं म्हणाले. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करायची आहे, की त्यांनी माझ्यासह कुटुंबाला संरक्षण देऊन न्याय द्यावा” अशी मागणी तक्रारदार सतीश जाधव यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.