नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात?

अंतर्गत मूल्यमापनाआधारे निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

0

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. मात्र, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करून आधीच्याच वर्गात बसवता येणार नाही.

गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला करोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे सद्य:स्थितीत शक्य नाही. विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. त्यानुसार आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याची परवानगी देण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे.

गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केले. जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षा देऊ शकले नव्हते त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शुल्क भरले नाही म्हणून शाळा अनुत्तीर्ण करत असल्याच्या तक्रारीही विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले तरीही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करून त्याच वर्गात बसवण्यात येऊ नये, असाही निर्णय घेण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे.

अकरावीचे शैक्षणिक वर्ष आताच सुरू

अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. ऑनलाइन वर्गात अद्याप पन्नास ते साठ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याची मुभा द्यावी, असे मत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी व्यक्त केले.

दहावी, बारावीच्या परीक्षेवर मात्र शिक्षण विभाग ठाम

शासनाने लागू केलेले निर्बंध, करोनाचे वाढते रुग्ण यांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत आहेत. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम आहे. या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून राज्यमंडळाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना जूनमध्ये अजून एक संधी देण्यात येणार आहे, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.