PHOTO | नाशिकमध्ये ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचे हाल

0 1

नाशिक : ऐन पावसाळ्यात नाशिक महापालिकेने विकासकामांच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

 

नाशिक : ऐन पावसाळ्यात नाशिक महापालिकेने विकासकामांच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. विकासकामे करण्यासाठी चांगल्या रस्त्यांची दुरवस्था करुन पावसाळ्यामध्ये रस्त्यावरील खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत, असा आरोप होत आहे. तसेच रस्ते खोदून ठेऊन महानगरपालिका नेमकं काय साधू इच्छित आहे ? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
विकास कामे ही नागरिकांच्या सोयीसाठी केली जातात. ही विकासकामे करताना नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये याचा प्रशासनाकडून कटाक्षाने विचार केला जातो. पण सध्या नाशिक शहरात परिस्थिती काहीशी उलटी आहे. मनपा प्रशासनातर्फे विकासकामांच्या नावाखाली शहरातील चांगले रस्ते खोदून ठेवले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेने हे रस्ते खोदले आहेत. याच कारणामुळे आधीच रस्ते ओले झालेले असताना वाहन चालकांना खोदलेल्या खड्ड्यांचा खूप त्रास होत आहे. शहरात गॅस लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. याच कारणामुळे हे खड्डे खोदण्यात आले आहेत.

नाशिक शहरात सध्या गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. याच गॅस लाईनसाठी शहरातील रस्ते मध्यभागीच फोडून ठेवलेत. पाऊस सुरू असताना रस्त्यावरील हे सर्व खड्डे पाण्याने भरतात. याच खड्ड्यात वाहनंसुद्धा फसतात. मध्यभागी रस्ता खोदल्यामुळे नागरिकांना हा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीबरोबरच वाहन या खड्ड्यांमध्ये फसत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

सध्याच्या विकासकामांची परिस्थिती तसेच रस्त्यांचे हाल याबाबत मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. मात्र, यावर बोलताना ही टेक्निकल बाब असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे गॅस लाईन टाकण्याचे काम बंद करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. सोबतच सध्या आहेत ते रस्ते व्यवस्थित करुन द्या, म्हणजे नागरिकांना ते सुखकर होईल, अशा सूचनाही मनपा आयुक्तांनी ठेकेदारास दिल्या आहेत.
दरम्यान, आधी चांगले रस्ते खोदण्यात आले. नंतर आता हेच रस्ते पुन्हा बनवण्यासाठी पैसे घालवण्यापेक्षा जी कामं आहेत ती रस्त्याच्या कडेने केली किंवा पर्यायी मार्ग वापरला तर चालणार नाही का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. तसेच सध्याचा चाललेला प्रकार हा ठेकेदारांचं भलं आणि नागरिकांचं शोषण यासाठी तर नाही ना ? असा प्रश्न विचारला जातोय.

Leave A Reply

Your email address will not be published.