Amravati: मशागत करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

शेतात काम करत असतानाच रानडुकरानं अचानक केलेल्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. तिवसा तालुक्यातील भारसवाडी इथं ही घटना घडली आहे. (Farmer injured in attack of wild boar in Tiwasa)

0 3

हायलाइट्स:

  • मशागत करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला
  • तिवसा तालुक्यातील भारसवाडी येथील घटना
  • रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

अमरावती: मेळघाट व मध्य प्रदेशच्या सीमेवरील भागात पाण्याच्या शोधात जंगली जनावरे लोकवस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून रानटी प्राण्यांकडून स्थानिक ग्रामस्थांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. तिवसा तालुक्यातील भारसवाडी शेतशिवारात काम करणाऱ्या एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. शरद गोविंदराव अळसपुरे (६०, रा. भारसवाडी) असे रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते रविवारी त्यांच्या शेतात काम करीत असताना अकराच्या सुमारास रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्यांच्या पोटावर व गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी अमरावती येथे रुग्णालयात दाखल केले. या घटनेची वनविभागाने नोंद घेतली आहे. या भागात रोही, रानडुकरामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सध्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. मान्सून दाखल होण्यापूर्वी पेरणीची तयारी करण्यासाठी शेतकरी पहाटेपासून सायंकाळपर्यंत शेतातच असतो. जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीत व शेतात येतात. त्यातून मानव व प्राण्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडत आहेत. यापूर्वीसुद्धा अनेक शेतकऱ्यांवर रान डुक्कर, अस्वलांसारख्या प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.