अनिल देशमुख CBI चौकशीला सामोरे जाणार; आजचा दिवस निर्णायक ठरणार

अनिल देशमुख जबाब नोंदवण्यासाठी सकाळी 11 वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर होतील. | Anil Deshmukh CBI

0 0

मुंबई: परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी केली जाणार आहे. (Former HM Anil Deshmukh will face CBI probe today in Mumbai)

यापूर्वी अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची जवळपास आठ तास झाडाझडती घेण्यात आली होती. तसेच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याकडूनही सीबीआयने माहिती घेतली होती. या सगळ्या माहितीच्याआधारे सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांना प्रश्न विचारतील. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुख यांना जबाब नोंदवण्यासाठी सकाळी 11 वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

परमबीर सिंह चौकशीत काय म्हणाले होते?

सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. या आरोपावर अनिल देशमुख काय बोलणार, हे पाहावे लागेल.

‘परमबीर सिंह यांना मुख्य आरोपी करणं केंद्र सरकारला मान्य नसावं’

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपास पथकाचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आला. दरम्यान इतक्या मोठ्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अनिल शुक्ला यांच्या बदलीचं कारण काय? अशी विचारणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती.

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं का ठेवली? कोणी ठेवली? हा तपास करण्याची आवश्यकता होती. दरम्यान परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं त्याचवेळी मी ते या कटात सहभागी असल्याचं म्हटलं होतं. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत. मला या प्रकरणात वेगळा वास येत आहे असं सांगितलं होतं. अनिल शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं असावं आणि हे केंद्र सरकारला मान्य नसावं, अशी शंका हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.