जालना जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जाणार नाही याची काळजी घ्या; राजेश टोपे यांचं आवाहन

0 7

जालना जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे.

 

जालना: जालना जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय आणि व्यवहार सुरू ठेवावेत. अति उत्साहामुळे आपल्या कुटुंबाला आणि जिल्ह्याला आपण पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत घेऊन जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी कोरडे, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रताप घोडके, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदी उपस्थित होते.

तिसरी लाट रोखण्याची तयारी करा

जालना जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.05 टक्के असून ऑक्सिजन बेड व्यापलेली टक्केवारी 17.65 टक्के इतकी आहे. त्यामुळे जालना जिल्हा शासनाने घोषित केलेल्या पहिल्या स्तरामध्ये समाविष्ट झाल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने कोरोनाच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याची गरज आहे. या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी, असे निर्देश टोपे यांनी दिले.

ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दर निश्चित

म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना याची खबरदारी घेण्यात यावी. प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांनी याबाबत दक्ष राहून काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. काही खासगी रुग्णालयांची या आजारावर उपचार करण्यासाठी जनआरोग्य योजनेत नोंद झालेली नाही. मात्र, तरीही अशा खासगी रुग्णालयात या आजारवर रुग्ण उपचार घेत असेल तर या रुग्णालयांसाठीही उपचाराची दर निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार नाही, याचीही दक्षता घ्या, असे निर्देशही त्यांनी दिले.

… तर पोलिसांची मदत घ्या

जालना जिल्ह्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक व कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. असं असलं तरी यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हायरिक्स व लोरिस्क सहवासितांच्या चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात याव्यात. तसेच गृहविलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. वेळप्रसंगी पोलीस विभागाची मदत घेण्यासाठी योग्य ते नियोजन करा, असे आदेशच त्यांनी दिले.

रुग्णांची दररोज 6 मिनिटं वॉकटेस्ट घ्या

कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घ्या. रुग्णांची दररोज 6 मिनिटं वॉकटेस्ट घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. (Another lockdown unaffordable, Rajesh Tope urges people to follow Covid-19 norms)

 

Leave A Reply

Your email address will not be published.