नागपूरचे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला नेण्याचा प्रयत्न उधळला

सतर्कतेमुळे चारही टँकर नागपूरला रवाना

0 29

नागपूर : राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नागपूर पहिल्या पाचमध्ये आहे. जिल्ह्यात ६४ हजारांवर कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १३ हजारांवर रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांना ऑक्सिजन दिला जात असल्याने तुटवडा पडू नये यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. अशा परिस्थितीत नागपुरात येत असलेले ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्यारे खान यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला आहे.

नागपूरला ऑक्सिजनचा पुरवठा भिलाई प्लँटमधून केला जात आहे. साधारण १९ टँकरमधून हे लिक्वीड ऑक्सिजनची वाहतूक केली जाते. वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी हाशमी रोड कॅरिअर प्रा. लि.चे संचालक प्यारे खान यांना देण्यात आली आहे. त्यांना भिलाई येथून ऑक्सिजन भरलेले टँकर नागपूरला पोहचण्यास उशीर होत असल्याचे लक्षात आले. प्यारे खान यांनी तातडीने टँकर चालकाला फोन लावून याची माहिती घेतली. चालकाने टँकरचे ब्रेक डाऊन झाल्याचे सांगितले.

खान यांनी तातडीने आपली मॅकेनिकची चमू सांगितलेल्या जागेवर पाठवली. परंतु तिथे टँकर नव्हते. प्यारे खान यांनी ऑक्सिजन पुरवठादार कंपनीशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आधी टाळाटाळ केली आणि नंतर उत्तरे देणेच बंद केले. यावरून टँकर पळवून नेत असल्याची बाब प्यारे खान यांच्या लक्षात आली. त्यांनी याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिली. हे चारही टँकर्स गुजरातमधील अहमदाबादच्या दिशेने निघाले होते. चारपैकी दोन टँकर्स औरंगाबादजवळ पोहोचले होते. तर इतर दोन टँकरही त्याच दिशेने निघाले होते. मात्र, खान यांनी आपली सूत्रे हलवून चारही टँकर्स नागपूरच्या दिशेने वळवायला लावले. यापैकी दोन टँकर्स नागपूरला पोहोचले असून उर्वरित दोन टँकर्स रात्री उशिरा नागपुरात पोहचले. प्यारे खान यांनी स्वत:च्या पैशातून ऑक्सिजनचे दोन टँकर दिले असून त्याच्या वाहतुकीसाठी ५० लाख रुपयांचीही मदत केली आहे.

पैशाच्या हव्यासापोटी परस्पर पाठविण्याचा प्रयत्न

गुजरातमधून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीला अधिकची रक्कम मिळत असल्याने जादा पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी चारही टँकर्स परस्पर अहमदाबादला पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु आम्ही प्रत्येक ऑक्सिजन टँकरवर नजर ठेवत असल्याने टँकर पळविण्याचा प्रयत्न उधळून लावला.

– प्यारे खान, संचालक, हाशमी रोड कॅरिअर प्रा. लि.

Leave A Reply

Your email address will not be published.