जुन्या राजकीय वादातून लाकडी दांड्याने मारहाण, औरंगाबादेत 50 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी

0 5

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या विटावा गावात ही घटना घडली. दगडू कावळे यांना जुन्या राजकीय वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे

 

औरंगाबाद : जुन्या राजकीय वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. 50 वर्षीय दगडू कावळे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. मुख्य आरोपीने कावळेंना लाकडी दांड्याने मारहाण केली, तर त्याच्या साथीदारांनी हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या विटावा गावात ही घटना घडली. दगडू कावळे यांना जुन्या राजकीय वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कावळे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा शिनगारे आणि त्याच्या चार साथीदारांवर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी कृष्णा शिनगारे हा 12 जुलै रोजी रात्री 9 नऊ वाजता दगडू कावळे यांना घराजवळ भेटायला गेला. कावळेंना त्याने आपल्या अल्टो कारमध्ये बसण्यास सांगितलं. यावेळी कृष्णाचे तीन मित्रही गाडीत होते. कारने सगळे विटावा फाटा परिसरात गेले. तिथे त्यांच्या राजकीय विषयावर गप्पा सुरु झाल्या.

लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण

आरोपी कृष्णा शिनगारेने अचानक आपल्याला जुन्या राजकीय वादातून शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने उजव्या कानावर चापट मारली. मी आरडाओरड केली असता त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण केली. तर त्याच्या तिघा मित्रांनी हाताने मारहाण करत पुढच्या वेळी तुला बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार दगडू कावळे यांनी केला आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी कावळे यांनी जखमी अवस्थेतच एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. कावळेंवर औरंगाबादमधील घाटीमध्ये उपचार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.