औरंगाबादेत कोरोनाची तिसरी लाट वेगात, पुढचे 10 दिवस धोक्याचे, तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय!
औरंगाबादः शहर आणि जिल्ह्यातील (Aurangabad corona) मागील आठ दिवसांमधील रुग्णांची वाढती संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे पूर्वीप्रमाणे लॉकडाऊन लावले जाणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले. तरीही राज्य शासनाने घालून दिलेले सर्व निर्बंध पाळले तर रुग्णवाढीचा आलेख रोखता येईल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती काय?
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी 317 नवे रुग्ण आढळले. यात शहरातील रुग्णांची संख्या 276 तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 41 एवढी आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी सुदैवाने जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.
शहरात पुढील 10 दिवस धोक्याचे!
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले, शहरातील रुग्णसंख्या केवळ 4 दिवसात 10 वरून 187 वर पोहोचली आहे. कोरोनाचा फैलाव याच गतीने होत राहिला तर पुढील आठ ते दहा दिवसात शहरात दररोज दोन हजार रुग्ण आढळून येतील. पुढील शनिवार- रविवारपर्यंत याबद्दलचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी ओळखत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?
शहरातील सध्या मेल्ट्रॉनमध्ये 112, खासगी रुग्णालयांत 82, घाटी रुग्णालयात 17 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी शहरात 276 रुग्णांची वाढ झाली. यात सर्वाधिक 18 ते 50 वयोगटातील 181 जण, 50 वर्षांवरील 64 जण तर 5 ते 18 वयोगटातील 27 रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात 41 टक्केच लसीकरण पूर्ण!
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एवढे कठोर नियम करण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणावर जन जागृतीही करण्यात आली. तरीही औरंगाबादमध्ये फक्त 41 टक्केच लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दुसरा डोस पूर्ण होऊन 90 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिले जात आहेत. 10 जानेवारीपासून या मोहिमेला प्रारंभ झाला. शहरात अशा 150 जणांनी बूस्टर डोस घेतला.