ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली ; उसाला तुरे आल्याने शेतकरी धास्तावले
मराठवाडय़ातील ४६ साखर साखर कारखान्यांमध्ये १७३.९७ लाख टन ऊस गाळप झाले.
औरंगाबाद : राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून ९५३ लाख ९४ हजार उसाचे गाळप झाले असले, तरी मराठवाडय़ातील बहुतांश उसाला आता तुरा आला आहे. जालना जिल्ह्यात ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता असून आता ऊस देयकांची रक्कम मिळू लागली असली, तरी मराठवाडा व खानदेशातील ५२ साखर कारखान्यांकडून गाळपातील २९५ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम देणे अद्यापि बाकी आहेत. उसाचे अमाप पीक आणि गाळपक्षमता याचा जालना जिल्ह्यातील ताळमेळ बसत नसल्याने अन्य कारखान्यास ऊस पाठवावा लागला तर वाहतूक अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. ऊस गाळपासाठी नेला जात नसल्याने साखर कारखानदारांची आर्जव करावी लागत आहे.
मराठवाडय़ातील ४६ साखर साखर कारखान्यांमध्ये १७३.९७ लाख टन ऊस गाळप झाले. त्यातून १७४. ९४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. पण साखरेचे सारे गणित तसे बिघडलेलेच आहे. कारखान्यांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना उंबरे झिजवावे लागत असून वशिला लावून सुद्धा ऊस वेळेवर गाळप होण्याची शक्यता कमी दिसत असल्याने विशेषत: जालना जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत. जालना जिल्ह्यात समर्थ व सागर हे दोन कारखाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. कारखाने फायद्यात चालविण्यासाठी लागणारे सर्व व्यवस्थापकीय कौशल्य त्यांनी जपले होते.
मात्र या वर्षी ऊस लागवड आणि गाळप यामध्ये मोठी तफावत येईल असा अंदाज अगदी सुरुवातीपासून व्यक्त होत होता. या जिल्ह्यात तीन सहकारी व दोन खासगी साखर कारखाने आहेत. त्याची क्षमता १४ हजार टन प्रतिदिन एवढी आहे. दररोज १५ हजार ७०० मे. टन गाळप होत असले तरी लागवडच्या प्रमाणाशी ते व्यस्त आहे. त्यामुळे गाळपाचा वेग अधिक असला तरी ऊस अतिरिक्त ठरण्याची भीती वाढली आहे. गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक लागवड असल्याने शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा येईल अशी शक्यता होती. मात्र, आता ऊस पक्व होत असल्याने साखर उताराही घटेल, असे सांगण्यात येत आहे.