अकाेला शहरातील २७ काेटींच्या विकासकामांना मंजुरीची प्रतीक्षा

Awaiting approval for development works of 27 crore in Akola city : प्रस्तावांना कधी मंजुरी मिळते, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

0 5

अकाेला: शहरातील विकासकामांसाठी अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत मंजूर निधीतून सर्वपक्षीय नगरसेवकांनी १७६ प्रस्ताव तयार केले. यामध्ये २७ काेटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश असून सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना कधी मंजुरी मिळते, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेला यंदा अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार याेजनेतून १० काेटींचा निधी मंजूर झाला हाेता. दरम्यान, शहराची झालेली हद्दवाढ लक्षात घेता हा निधी अपुरा असल्यामुळे पुनर्विनियाेजन अंतर्गत अतिरिक्त ४२ काेटी ५० लाख असा एकूण ५२ काेटी ५० लाख रुपयांतून विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी २७ काेटी ३९ लाख रुपयांतून १७६ प्रस्ताव तयार केले. या प्रस्तावांची बांधकाम विभागाने पडताळणी केल्यानंतर प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.

१६१ प्रस्ताव आहेत काेठे? नागरी दलित वस्ती सुधार याेजनेंतर्गत मनपाला मंजूर झालेल्या ५२ काेटी ५० लक्ष रुपये निधीतून विकासकामांचे एकूण ३३७ प्रस्ताव तयार करण्यात आले हाेते. यामध्ये रस्ते, नाल्या, धापे, पेव्हर ब्लाॅक, सामाजिक सभागृह, उद्यानांचे साैंदर्यीकरण, विद्युत पाेल उभारणे आदी विकासकामांचा समावेश आहे. या प्रस्तावांना १८ फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या सभेची मान्यता आहे. मनपाने जिल्हा प्रशासनाकडे १७६ प्रस्ताव सादर केल्यानंतर उर्वरित १६१ प्रस्ताव आहेत काेठे, ते काेणाच्या इशाऱ्यावरून रखडले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.

मुदत संपली तरीही प्रस्ताव नाहीत! मनपाला चालू आर्थिक वर्षासाठी सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेंतर्गत ७ काेटी ५० लक्ष निधी मंजूर झाला हाेता. यामध्ये शासनाने काेविडसाठी ३० टक्क्यांनुसार २ काेटी २५ लक्षाची कपात केली. अर्थात उर्वरित ५ काेटी २५ लक्षाच्या निधीत मनपाचा ३० टक्के आर्थिक हिस्सा लक्षात घेता ६ काेटी ८२ लक्ष ५० हजार रुपयांतून विकासकामांचे प्रस्ताव तयार हाेणे भाग हाेते. दलितेतर वस्तीत सुधारणेसाठी ७ काेटी ५० लक्ष मंजूर झाले हाेते. यातही शासनाने काेविडसाठी ३० टक्क्यांनुसार २ काेटी २५ लक्षाची कपात करून ५ काेटी २५ लक्ष रुपये मनपाकडे सुपूर्द केले. या दाेन्ही याेजनांसाठी प्राप्त निधीची मुदत संपली तरीही प्रस्ताव तयार नसल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.