नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आजपासून पक्षी महोत्सव
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवस निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
नाशिक : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवस निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी दिली.
महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ास ज्येष्ठ पक्षी निरीक्षक दत्ता उगांवकर, पक्षी मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर जगताप, निफाडचे पक्षी मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले, वनसंरक्षक वाय. एल. केसरकर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळय़ापूर्वी नाशिक ते नांदुरमध्यमेश्वर अशी बर्ड सायक्लोथॉन होणार आहे. पर्यटन संचालनालय कार्यालयापासून अभयारण्य परिसरापर्यंत ही सायकल फेरी होईल. उद्घाटन सत्रानंतर स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन नांदुरमधमेश्वर या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये अभयारण्य ते जागतिक रामसर स्थळ प्रवास व आव्हाने या विषयावर जळगांव येथील वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, नांदुरमध्यमेश्वर-स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर या विषयावर ज्येष्ठ पक्षी निरीक्षक सतीश गोगटे, पानथळाचे संवर्धन काळाची गरज या विषयावर डॉ. जयंत वडतकर मार्गदर्शन करतील.
दुपारच्या सत्रात नाशिक जिल्ह्यातील वनवैभव आणि वन पर्यटन अंतर्गत नाशिक जिल्हा पक्षी विविधता या विषयावर पक्षी मित्र डॉ. अनिल माळी, नांदुरमध्यमेश्वर येथील पानपक्षी त्यांचे निवासस्थान आणि खाद्य विविधता या विषयावर डॉ. प्रशांत वाघ, नाशिक जिल्ह्यातील वनवैभव आणि संरक्षित क्षेत्र पर्यटन या विषयावर नेचर कनव्र्हेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या प्रतीक्षा कोठुळे मार्गदर्शन करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वन्यजीव चित्रकला स्पर्धा होणार आहे. आठवी ते दहावीसाठी वन, वणवा तर, मुक्तगटासाठी छायाचित्र स्पर्धेसाठी नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य निसर्गदृश्य, पाणवठय़ावरील पक्षी हे विषय देण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात शाश्वत पर्यटन विकासात स्थानिकांचा सहभाग विषयावरील चर्चेत मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, कृषी पर्यटनातील संधी-सद्यस्थिती-भविष्य या चर्चासत्रात मनोज हाडवळे, मानव वन्यजीव सहजीवनचे डॉ. सुजीत नेवसे सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. यावेळी आ. दिलीप बनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत.