Being Human : अभिनेता सलमान खान अडचणीत? आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची नोटीस!

0 19

बॉलिवुड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या बहिणीविरोधात चंदीगडमध्ये आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली आहे. त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.

बॉलिवुड अभिनेता सलमान खान अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. कधी ते ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण असतं, तर कधी काळवीट शिकार प्रकरण. मात्र, आता या दोन्ही प्रकरणांचा सलमानच्या चाहत्यांना विसर पडला असतानाच आता आणखीन एका प्रकरणामध्ये सलमान खानचं नाव आलं आहे. पण यावेळी फक्त सलमान खानचंच नाव आलं नसून, त्याची बहीण अलविरा आणि इतर ७ जणांची देखील नावं एका प्रकरणात गुंतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात या सर्व जणांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. तसेच, नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांना १३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं एएनआयनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नेमकं घडलं काय?

अरुण गुप्ता नावाच्या एका व्यावसायिकाने यासंदर्भात सलमान खान आणि त्याच्या Being Human विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीविषयी सांगताना अरुण गुप्ता म्हणाले, “बिइंग ह्युमनचे दोन कर्मचारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला बिइंग ह्युमनची फ्रँचायजी उघडायला सांगितलं. आमची बोलणी झाली आणि आम्ही होकार दिला. त्यांनी आम्हाला सांगितलं की या सगळ्याला २ कोटींची गुंतवणूक करावी लागेल. त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की स्टोअरच्या उद्घाटनाला स्वत: सलमान खान येईल”.

मी सलमानला भेटलो, पण…

तक्रारदार अरुण गुप्ता यांनी सलमानला भेटून याविषयी चर्चा केल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. “स्टोअर सुरू झाल्यानंतर आम्हाला स्पॉट मिळालाच नाही. त्यांनी आम्हाला फोन केला आणि सलमान खानला भेटून चर्चा करण्यासाठी बोलावलं. मी त्याला भेटलो. त्यानं मला आश्वासन देखील दिलं. पण आता त्या गोष्टीला दीड वर्ष झालं. अजूनही मला काहीही मिळालेलं नाही. सलमान खान माझ्या पत्रांना उत्तरही देत नाही”, असं अरुण गुप्ता यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

…तर कारवाई केली जाईल!

दरम्यान, अरुण गुप्ता यांच्या तक्रारीनुसार चंदीगड पोलिसांनी सलमान खान, त्याची बहीण अलविरा खान आणि बिइंग ह्युमनचे इतर ७ जण अशा ९ जणांना नोटीस बजावली आहे. “नोटिशीला उत्तर देण्यासाठी त्यांना १३ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जर या सगळ्या व्यवहारामध्ये काहीही बेकायदेशीर आढळलं, तर त्यानुसार कारवाई करण्यात येईल”, अशी माहिती चंदीगढचे पोलीस अधीक्षक केतन बन्सल यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.