ब्राझीलचा भारताकडून कोव्हॅक्सिन घेण्यास नकार, 2 कोटी डोसची ऑर्डर रद्द!
भारत बायोटेक कंपनीच्या (Bharat Biotech's Covaxin) प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा ब्राझीलनं मारला आहे.ब्राझीलनं कोव्हॅक्सिनच्या आयातीस (Import of Covaxin) नकार दिला आहे.
नवी दिल्ली 01 मार्च : ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात (India) तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस (Import of Covaxin) नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. मात्र भारत बायोटेक कंपनीच्या (Bharat Biotech’s Covaxin) प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा ब्राझीलनं मारला आहे. यावर आता भारत बायोटेककडून प्रतिक्रिया आली असून ब्राझीलसोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या निर्मात्यांनी म्हटलं, की ब्राझीलनं सांगितलेल्या गरजांची पूर्तता केली जाईल. त्यांनी सांगितलं की गरजा पूर्ण करण्यासाठीच्या वेळेबद्दल ब्राझीलसोबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच यावर मार्ग काढला जाईल. आणखी एका अहवालानुसार, हैदराबाद स्थित कंपनीनं म्हटलंस की तपासणीदरम्यान समोर आलेल्या मुद्द्यांवर काम सुरू आहे. सोबतच ब्राझीलनं दोन कोटी डोसची ऑर्डर रद्द केली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सध्या भारतात कॉव्हॅक्सिन आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या कोविशील्डचा वापर केला जात आहे.
भारतात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं कोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापरास जानेवारीमध्ये परवानगी दिली आहे. ही लस भारत बायोटेकनं इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चसोबत मिळून तयार केली आहे. मागील महिन्यातच ब्राझीलनं दोन कोटी डोससाठी करार केला होता. मात्र, ब्राझीलनं नंतर यात काही सुधारणा सुचवल्यानं कंपनी यावर काम करत आहेत. त्यामुळे, आता हा करार रद्द होणार की सुधारणांनंतर ब्राझील लसीचे डोस घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.