BREAKING : सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, एसटी सेवेवर होऊ शकतो परिणाम

राज्य सरकारकडून एसटी बस (ST Bus) सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

0

मुंबई, 7 एप्रिल : राज्यात कोविड 19 संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लावत मिनी लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. मात्र कोरोना संसर्ग पसरण्याचा वेग मोठा असल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस (ST Bus) सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.

आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आंतरराज्य एसटीची प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबतच्या कोणत्याही निर्णयाची राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच अशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

वाहतूक सेवेबाबत सरकारने कोणता निर्णय घेतला आहे?

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यभरात निर्बंध लादले आहेत. मात्र सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

‘सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे,’ असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.