ब्रूक फार्मावरुन वाद, फडणवीसांनी पोलिसांना विचारला जाब

0 1

मुंबई: राज्यात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहे. कोरोनाच्या आजारावर हे इंजेक्शन गुणकारी ठरत आहे. पण रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही इंजेक्शन्स अपुरी पडत आहेत. आता या रेमडेसिव्हीरवरुन राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला मिळू नये, म्हणून केंद्र सरकार कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर काल रात्री पोलिसांनी ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना ताब्यात घेतले. त्यांना विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणून ४५ मिनिटं त्यांची चौकशी केली. ब्रूक फार्माच्या संचालकांना ताब्यात घेतल्याचं समजल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. या कारवाईबद्दल पोलिसांना थेट जाब विचारला. पोलिसांनी चौकशीनंतर ब्रूक फार्माच्या संचालकांना सोडून दिले.

ब्रूक फार्मा ही गुजरातच्या दमणमधील कंपनी आहे. ही कंपनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करते. महाराष्ट्र भाजप गुजरात मधील याच ब्रूक फार्मा कंपनीकडून महाराष्ट्रासाठी ५० हजार रेमडेसिव्हीर टप्प्याटप्प्याने खरेदी करणार आहे.

राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गुजरात मधील ब्रूक फार्मा कंपनीला भेट दिली होती. यावेळी राज्यासाठी ५० हजार रेमडेसिव्हीर खरेदीची तयारी भाजप कडून करण्यात आली. ब्रूक फार्मा या कंपनीकडे एक्स्पोर्ट चे लायसन्स असल्याने त्यांना राज्यात विक्रीचा परवाना नव्हता.

पोलिसांचं काय म्हणणं आहे?

“आम्हाला आमच्या नेटवर्कमधुन माहिती मिळाली होती की, दमणमध्ये बनवलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा साठा मुंबईत स्टोअर करण्यात आला असून एअर कार्गोने मुंबईबाहेर पाठवणार असल्याची माहिती मिळाली होती. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन किती महत्त्वाचे आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या इंजेक्शनचा तुटवडा असून रेमडेसिव्हीरला सरकारने निर्यातबंदी केली आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच पाऊल उचलले. आम्ही फार्मा कंपनीच्या मालकाला बोलवून घेतले व साठा कुठे केला आहे? त्याबद्दल विचारले. लोकांच्या हितांच्या दृष्टीने आम्ही चांगल्या भावनेतून ही कारवाई केली” असे झोन आठचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.

नवाब मलिक यांनी काय टि्वट केलय?

“महाराष्ट्राने रेमडेसिव्हीर बनवणाऱ्या १६ निर्यातदार कंपन्यांकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी केली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिव्हीरचा पुरवठा करु नये, अशी केंद्र सरकारने ताकीद दिल्याचे सांगितले. महाराष्ट्राला रेमडेसिव्हीरचा पुरवठा केला, तर परवाना रद्द करण्याची धमकी या कंपन्यांना देण्यात आली आहे. हे खूप दु:खद आणि धक्कादायक आहे” असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.