आठवडी बाजारात प्राणघातक हल्ला; ७० दिवसांनंतर आरोपी बापलेकाला ठोकल्या बेड्या

आरोपी अनेक दिवस फरार

0 7

हायलाइट्स:

  • आठवडी बाजारातील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला
  • ७० दिवसांनंतर आरोपी बापलेक अटकेत
  • बुलडाणा जिल्ह्यातील घटना

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील आठवडी बाजारात भंगार व्यावसायिक इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणाचा प्रमुख आरोपी आणि नगर पालिकेचा कर्मचारी आनंदमोहन अहिर याला आज शहर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल सव्वा दोन महिन्यांनी मुख्य आरोपी आनंदमोहन अहिर आणि मुलगा आदित्य यांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं असून दोन्ही आरोपींना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आठवडी बाजार परिसरात राजेंद्र इंगळे (वय ५६) यांचा भंगार दुकानाचा व्यवसाय असून २७ मार्च रोजी आरोपी आनंदमोहन अहिर हे त्यांच्या दुकानात आले आणि इंगळे यांना शिवीगाळ करून राजेंद्र इंगळे व त्यांचा भाऊ, मुलगा यांना लोखंडी रॉड, हातोडी, सेंट्रींगचे राफ्टर, लोखंडी झारे घेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मुलगा अभयला डोक्यावर हातोडी, लोखंडी पाईप, लोखंडी झारे यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. राजेंद्र इंगळे यांनी २८ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अनेक दिवस फरार

गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल सव्वादोन महिने फरार असलेल्या आनंदमोहन अहिर आणि त्याच्या मुलाच्या मागावर पोलिस होते. दरम्यान, शनिवारी सापळा रचल्यानंतर शहर पोलिसांच्या एका पथकाने आनंदमोहन अहिर याच्यासोबतच त्याचा मुलगा आदित्य याला अमरावतीच्या बडनेरा येथील जुन्यावस्तीतील एका घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणील ५ आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे गंभीर गुन्हे दाखल होऊनही नगरपालिकेचा कर्मचारी असलेल्या अहिर याच्यावर पालिकेनं अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आता आरोपीच्या अटकेनंतर तरी त्याच्यावर पालिकेकडून कारवाई होते का, हे पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.