बुलढाणा : डोक्यात दगड मारून महिलेची हत्या; आरोपीस अटक
मोताळा (जि. बुलढाणा ) : एका ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड मारून तिची निर्घृण हत्या
मोताळा (जि. बुलढाणा ) : क्षुल्लक वादातून एका ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड मारून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी खरबडी शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
तालुक्यातील बोराखेडी येथील आसाराम गंगाराम येदमल (८०) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची मुलगी पंचफुला हिचे २० वर्षांपूर्वी शंकर काळूराम येखनार याच्यासोबत लग्न झाले होते. तिला तीन मुली व एक मुलगा आहे. परंतु पंचफुला येखनार ही मागील चार वर्षांपासून बोराखेडी येथील गजानन गणेश सोनुने (४०) याच्या सोबत राहत होती. पंचफुला ही अधून-मधून आईवडिलांकडे भेटीला येत होती व गजानन सोनुने हा तिला दारू पिऊन नेहमी मारहाण करतो, असे सांगत होती. त्यावेळी आईवडिलांनी तिची समजूत घातली.
मात्र पंचफुला व गजानन सोनुने यांच्यात नेहमी वाद होत होते. दरम्यान, सोमवारी (ता.२९) सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास गजानन व पंचफुला यांच्यात भांडण झाले. यावेळी गजानन सोनुने याने पंचफुला येखनार यांना मारहाण केली व तिच्या डोक्यात दगड मारून तिची हत्या केली. सदर प्रकार किसन नाफडे यांच्या खरबडी शिवारातील शेतात मंगळवारी (ता.३०) दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आला.