अखेर महाराष्ट्राला केंद्राकडून रेमडेसिविरचा जादा पुरवठा; उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि रेमडेसिविर मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्राने साठा वाढवला.

0 6

नवी दिल्ली : देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या आणि  रेमडेसिविर    (Remdesivir) मिळण्यावरून रुग्णांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत केंद्र सरकारने  (Central Government) महाराष्ट्राला रेमडेसिविरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्याला ४,३५,००० रेमडेसिविर देण्यात येणार आहे.  केंद्राने राज्य सरकारची मागणी पुर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान मोदींचं आभार मानणारं  ट्विट करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडेसिविरचा पुरवठा करण्याच्या मागणीला मंजूरी दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचे आभार मानले आहेत, अशा आशयाचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यात होत असलेल्या रेमडेसिविरच्या तुटवड्याकडे केंद्राचं लक्ष वेधले होते. त्यानंतर पत्राद्वारेही पंतप्रधान मोदींना रेमडेसिविरचा पुरवठा वाढवावा, अशी विनंती केली होती. दरम्यान राज्याला सध्या २ लाख ६९ हजार रेमडेसिविरचा पुरवठा केला जात होता, पण आता हा पुरवठा वाढवला जाणार असून तो ४ लाख ३५ हजाराने केला जाणार आहे.

गेल्या महिनाभर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये रेमडेसिवीर मिळण्यावरून तीव्र असंतोष निर्माण झाला होता. जागोजागी औषध विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर रेमडेसिविरसाठी रांगा लागायच्या. रेमडेसिविर मिळत नाही म्हणून लोकांचा संताप वाढायला लागल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिविरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले.

जागोजागी साठेबाज शोधण्याच्या कामाला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लागले. अखेर लोकांच्या संतापाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिविर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिविर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिविर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.