Chhattisgarh Naxal Attack: बीजापूर नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कमांडर हिडमा असल्याचं स्पष्ट

नक्षलवाद्यांच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर हिडमा हा या भागात असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याला जेरबंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी ही मोहीम आखली. या हल्ल्याच्या वेळी हिडमा स्वत: उपस्थित होता.

0

रायपूर : छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हा हिडमा नावाचा नक्षलवादी कमांडर असल्याचं स्पष्ट झालंय. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.

ही घटना घडायच्या आधी हिडमा टेकुलगुडा आणि जुनागुडा गावाच्या जवळ असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. नक्षलींच्या मिलिटरी बटालियनचा मुख्य कमांडर त्या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी एकत्रित मोहीम राबवून हिडमाला जेरबंद करण्याची योजना आखली होती. त्यासाठीच सीआरपीएफ, बीजपुर पोलिसांचे डीआरजी युनिट तसेच एसटीएफचे शेकडो जवान बीजपुर आणि सुकमा जिल्ह्यातून टेकुलगुडा आणि जुनागुडा च्या दिशेने निघाले होते.

शनिवारी दुपारी एक वाजायच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी जुनगुडा गावाजवळ सुरक्षा दलांवर पहिला हल्ला केला. तिथे नक्षलींनी यू आकाराची रचना करत सुरक्षा दलांना घेरले आणि जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्याना घेऊन पोलीस पार्टी पुढे जात असताना टेकुलगुडा येथे दुसरा हल्ला करण्यात आला.

हल्ल्याच्या वेळी हिडमा स्वत: उपस्थित

टेकुलगुडा या ठिकाणी करण्यात आलेला हा हल्ला जास्त भीषण होता. अनेक तास दोन्ही बाजूनी गोळीबार झाला आणि त्यात सुरक्षा दलांचे सर्वाधिक नुकसान झाले. माहिती अशी आहे की या ठिकाणी, चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून  जवळच  स्वतः हिडमा उपस्थित होता. हल्ल्याच्या शेवटी तो 40 नक्षलीसोबत चकमकीच्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने टेकुलगुडा गावाच्या अंगणात अनेक पोलिसांची हत्या केली.

आताच्या घडीला हिडमा हा सर्वात कुख्यात आणि क्रूरकर्मा नक्षली कमांडर समजला जातोय. त्याने बिजापूर सारखेच अनेक मोठे हल्ले पोलिसांवर घडविले आहे. तो गनिमी काव्याच्या हल्ल्याची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात चाणाक्ष मानला जातो. त्यामुळेच त्याच्याकडे नक्षलींच्या मिलिटरी युनिटच्या कमांडर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.