Chhattisgarh Maoist Attack: गृहमंत्री ‘अमित शहा इन अ‍ॅक्शन’, आज करणार छत्तीसगडचा दौरा

छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 24 जवानांना वीरमरण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) या हल्ल्यानंतर प्रथमच छत्तीसगडचा दौरा करणार आहेत.

0

नवी दिल्ली, 5 एप्रिल: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या बॉर्डरवर (Bijapur- Sukma Border) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 24 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यामध्ये 700 पेक्षा जास्त नक्षलवादी सहभागी झाले होते. या नक्षलवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. त्यापाठोपाठ अमित शहा आज जगदलपूर, बिजापूर आणि रायपूरचा दौरा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री नवी दिल्लीहून थेट जगदलपूरमध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना ते श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर एका उच्चस्तरीय बैठकीतही अमित शहा सहभागी होतील. या  बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह आयबी, सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी या प्रकरणात चालेल्या चुकांसह पुढील रणणितीवर चर्चा होईल.

असा असेल अमित शहांचा कार्यक्रम

गृहमंत्री सकाळी जगदलपूरला दाखल होती, त्यानंतर बिजापूरमधील बासेगुडामध्ये असलेल्या सीआरपीएफ कँपला ते भेट देणार आहेत. त्या ठिकाणी ते अधिकारी आणि जवानांशी चर्चा करतील. सुमारे तासभर अमित शहा सीआरपीएफ कँपमध्ये असतील. त्यानंतर ते राजधानी राजपूरमध्ये येणार आहेत. रायपूरमध्ये ते साधारण दोन तास असतील. यावेळी ते चार खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जवानांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर संध्याकाळी अमित शहा दिल्लीला रवाना होतील.

CRPF सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत 24 जवानांना वीरमरण आलं आहे. तब्बल 700 नक्षलवाद्यांचा या घटनेत हात होता. CRPF च्या जवानांना या नक्षलवाद्यांनी चारही बाजूंनी घेरलं होतं. संपूर्ण कट रचून या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. इतकंच नाही तर या कटामध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील नक्षलवादीही सामील असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.