ठेकेदाराने कुटीर रूग्णालयाला ठेवले ऑक्सिजनवर

CoronaVIrus Sawantwadi Hospital Sindhudurg : सावंतवाडी कुटीर रूग्णालयाबाहेर ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या ठेकेदाराकडे राज्यातील अनेक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा ठेका असल्याने कुटीर रूग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच ऑक्सिजनवर आहे.

0 0

सावंतवाडी : कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावशाली होती. अनेकांना ऑक्सिजनअभावी आपला जीव गमवावा लागला. तिसरी लाटही अधिक प्रभावशाली असल्याने शासनाने सर्व प्रमुख रूग्णालयांबाहेर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र सावंतवाडी कुटीर रूग्णालयाबाहेर ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या ठेकेदाराकडे राज्यातील अनेक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा ठेका असल्याने कुटीर रूग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच ऑक्सिजनवर आहे. ८६ लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणारा हा ऑक्सिजन प्लांट कितीजणांचे जीव घेणार, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोरोनाची पहिली लाट जेवढी प्रभावी नव्हती त्यापेक्षा दुसरी लाट ही अधिक प्रभावी होती. अनेकांना ऑक्सिजनअभावी आपले जीव गमवावे लागले आहेत. अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुसरी लाटही ओसरताना दिसत नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्याचे आदेश शासनाने प्रत्येक शासकीय रूग्णालयांना दिले आहेत. मात्र, सावंतवाडी कुटीर रूग्णालयाने पहिल्या लाटेतून धडा घेतला नव्हता कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दिलेले दहा व्हेटिलेंटर तसेच पडून होते. ते दुसऱ्या लाटेचा कहर झाल्यानंतर त्यातील दोन व्हेटिलेंटर सुरू करण्यात आले.

दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी अनेक माणसे मृत पावली. त्यामुळे कोल्हापूर तसेच रायगड, गोवा येथून ऑक्सिजन सिलिंडर आणावे लागत असल्याने शासनाने प्रत्येक रूग्णालयाच्या बाहेर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात सावंतवाडी, कणकवली, ओरोस जिल्हा रूग्णालयात हे प्लांट उभारण्यात येणार होते. त्यातील सावंतवाडीतील ऑक्सिजन प्लांटची जागा निश्चित करण्यात आली.

त्यानंतर ही निविदा प्रकिया २४ एप्रिलला पार पडली असून, हा ठेका औरंगाबाद येथील कंपनीला देण्यात आला. यासाठी जिल्हा नियोजनमधून ८६ लाखांचा निधी देण्यात आला. मात्र, सावंतवाडीत ऑक्सिजन प्लांटचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अगोदरच राज्यातील अनेक ऑक्सिजन प्लांटचे ठेके घेतल्याने येथील हा प्लांट उभारणे सध्यातरी कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असतानाच ठेकेदारांच्या विलंबाने आणखी कितीजणांना आपला प्राण गमवावा लागणार, असा प्रश्न पुढे येत आहे.

इतर प्लांटची कामे झाली की सावंतवाडीत येणार

सावंतवाडी कुटीर रूग्णालय प्रशासनाने संबंधित ठेकेदाराशी संपर्क केला असता, इतर प्लांटची कामे झाल्यानंतर आपल्याकडे येणार, असे उत्तर देण्यात आल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.