Corona virus in Washim : बालकांसाठी १२५ खाटांची स्वतंत्र सुविधा

Separate facility of 125 beds for children : लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे.

0 7

वाशिम : राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे, तसेच तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होण्याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत त्यादृष्टीने सज्जता करण्यात येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचारासाठी १०० खाटांची स्वतंत्र सुविधा, तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथेही लहान मुलांसाठी २५ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला.

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी सर्व सोयी-सुविधायुक्त स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली. बालकांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात आली आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये १०० खाटांची, तर कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे २५ खाटांची स्वतंत्र सुविधा उपलब्ध केली आहे. लहान मुलांच्या कक्षामध्ये खेळणी, सायकल, दूरचित्रवाणी संच यासारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, भिंतीवर विविध कार्टून लावण्यात आली आहेत. यामुळे लहान मुलांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -डॉ. राठोड कोरोनाबाधित लहान मुलांसाठी तयार असलेल्या विविध कक्षांमधील सर्व खाटांना सेंट्रल पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, तसेच नवजात शिशू अतिदक्षता विभागात ६ इनक्युबेटर, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १० व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

६ बालरोगतज्ज्ञ व १२ स्टाफ नर्सेससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा चमू याठिकाणी नियुक्त केला जाणार असून, सर्वांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे, पूर्वतयारी करण्यात आली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.