कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करा – मुख्यमंत्री

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी तयारी करावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

0 35

मुंबईः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व  जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. कोरोना संदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. COVID-19: We have to be careful and plan for third wave says Uddhav Thackeray

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो; असे मुख्यमंत्री म्हणाले.

परराज्यांतून येणाऱ्या प्रत्येकाची नोंद करुन त्यांच्या चाचण्या करा. आवश्यक ते उपाय करा. पण परराज्यांतून कोरोनाचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर पसरणार नाही याची खबरदारी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिली.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे; असे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.