बुलडाण्यातल्या वॉर्डबॉयची करामत, सुट्टी मिळवण्यासाठी निगेटिव्ह व्यक्तींना दाखवलं पॉझिटिव्ह

कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स आणि मेडिकल लिव्हचा लाभ मिळावा म्हणून हा आरोपी पैसे घेऊन या कर्मचाऱ्यांचे निगेटिव्ह स्वॅब पॉझिटिव्ह रुग्णांच्या स्वॅबसोबत बदलायचा.

0 6

बुलडाणा

जिल्ह्यातल्या खामगावमधल्या सरकारी रुग्णालयातल्या एका वॉर्डबॉयने प्रयोगशाळेतले स्वॅबचे नमुनेच चक्क बदलले. एका खासगी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना मेडिकल कारणासाठी दिल्या जाणाऱ्या सुट्टीचा लाभ घेता यावा म्हणून त्याने हे नमुने बदलले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणात आरोपी विजय राखोंडे याला अटक करण्यात आली आहे. विजय राखोंडे हा खामगावच्या सरकारी रुग्णालयातला कंत्राटी कर्मचारी आहे. रुग्णालयाच्या डॉ. निलेश टापरे या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन या वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विजय राखोंडेच्या मदतीने स्वॅबचे नमुने बदलून करोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल तयार केला.

सदर वैद्यकीय अधिकाऱ्याला या गोष्टीची कुणकुण लागली की विजय राखोंडे हा पॉझिटिव्ह व्यक्तींच्या करोना अहवालासोबत काही छेडछाड करत आहे. तो पॉझिटिव्ह व्यक्तींचे आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे स्वॅबचे नमुने बदलत असल्याचं कळलं. जेणेकरुन हे कर्मचारी करोना अहवाल निगेटिव्ह आला तरी वैद्यकीय कारणासाठी दिल्या जाणाऱ्या सुट्टीचा लाभ घेऊ शकतील तसंच या बनावट करोना अहवालाच्या मदतीने इन्शुरन्सचा लाभही घेऊ शकतील.

हा आरोपी चाचण्यांच्या लॅबमध्ये जायचा आणि स्वॅब बदलायचा. यासाठी तो या कर्मचाऱ्यांकडून पैसेही घ्यायचा, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिसांनी या प्रकऱणी खासगी कंपनीचा एक कर्मचारी चंद्रकांत उमप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानेच विजयला चार स्वॅबचे नमुने बदलायला सांगितले. पोलिसांना संशय आहे की या प्रकरणात इतरही काहीजण सहभागी असू शकतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.