दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा; आरक्षणाचा लाभ : प्रो-गोविंदा स्पर्धा भरविण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

0

मुंबई : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोटय़ातून सरकारी नोकऱ्यांसाठीही आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा द्यावा आणि त्यानिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे. दहीहंडी हा सण-उत्सव असला तरी त्यातील साहस आणि क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे आता गोविंदांना वर्षभर मानवी मनोऱ्याचा खेळ खेळता येईल. त्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि राज्य सरकारतर्फे बक्षिसे मिळावीत यासाठी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. खेळाडूंना विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के राखीव जागा असतात. गोविंदांनाही आता खेळाडूंच्या कोटय़ातून सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

१८ वर्षांखालील गोविंदांना मदत नाही

मानवी मनोरा रचताना थर कोसळून गोविंदा जखमी झाल्यास किंवा मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतीसाठी १८ वर्षे पूर्ण असलेले गोविंदाच पात्र ठरतील, असे याबाबतच्या शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील गोविंदा जखमी झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास सरकारची मदत मिळणार नाही.

सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार

दहीहंडीवेळी गोविंदा जखमी झाल्यास महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत किरकोळ जखमी होणाऱ्या गोविंदांवर मोफत उपचारांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

गणेशोत्सव, दहीहंडीच्या काळातील खटले मागे

मुंबई : गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कायदेशीर सूचनांचे उल्लंघन झाल्याबद्दल दाखल झालेले आणि ३१ मार्च २०२२ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटले मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यासाठी तीन अटी असून,  पोलीस आयुक्त आणि इतर भागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अधिकार देण्यात आले आहेत.

ठाण्यात कोटय़वधीची बक्षिसे

ठाणे : यंदा ठाणे शहरात राजकीय नेत्यांनी उंच दहीहंडीसाठी बक्षिसांची खैरात केली आहे.  स्वामी प्रतिष्ठानने ५१ लाखांपर्यंत, संस्कृती युवा प्रतिष्ठानने २१ लाख, मनसेने ५५ लाखांपर्यंत, टेंभीनाका मित्र मंडळाने २ लाख ५१ हजार रुपये बक्षीस जाहीर केले.  सर्व मंडळांच्या बक्षिसांची रक्कम सुमारे दीड-दोन कोटी आहे.

दुर्घटनाग्रस्त गोविंदांना मदत

  • गोविंदा पथकातील खेळाडूंचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची मदत केली जाईल.
  • दहीहंडीच्या थरावरून पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्या गोविंदाला साडेसात लाखांची मदत केली जाईल.
  • दहीहंडीच्या थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्या गोविंदाला ५ लाखांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
  • हा आदेश केवळ यंदासाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत नंतर स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.
  • विम्याचा हप्ता भरण्याची योजना सरकार तपासत असून नंतर निर्णय होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आज सार्वजनिक सुटी : दहीहंडीनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुटी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.