मतदारांत ३० हजारांची घट
पालघर जिल्ह्यातील दुबार मतदार नोंदी तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणात वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजारांनी कमी झाली आहे.
पालघर जिल्ह्यात २० लाख १३ हजार ६५५ मतदार
पालघर : पालघर जिल्ह्यातील दुबार मतदार नोंदी तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणात वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजारांनी कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या २० लाख १३ हजार ६५५ मतदार संख्या निश्चित झाली असून ऑक्टोबर २०१९च्या तुलनेत ६२ हजारांनी अधिक आहे. १० जानेवारी २०२० रोजी घोषित झालेल्या मतदार संख्येनुसार पालघर जिल्ह्यात दहा लाख ५६ हजार ८१० पुरुष मतदार, ९ लाख ५६ हजार ६६७ महिला मतदार तर १६८ तृतीयपंथी मतदार आहेत. १५ जानेवारी २०२१च्या तुलनेत मतदार संख्या ३० हजार ६३४ने कमी झाली असून नालासोपारा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५४ हजार ५३६ मतदार कमी झाले आहेत. याचबरोबरीने विक्रमगड विधानसभा क्षेत्रात १२०७३ मतदार वाढले असून डहाणू विधानसभा क्षेत्रात ५४४०, वसई विधानसभा क्षेत्रात ३८९०, बोईसर विधानसभा क्षेत्रात १६६४ तर पालघर विधानसभा क्षेत्रात ८३५ मतदार वाढले आहेत.