Har Ghar Tiranga: तिरंग्याच्या मागणीत दहापट वाढ, सगळी कामं सोडून होतेय फक्त तिरंग्याची छपाई

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे

0

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचं आवाहन देशातील नागरिकांना केलं असून, यानिनित्ताने घरोघरी झेंडा फडकवण्यास सांगण्यात आलं आहे. याचा परिमाण बाजारात दिसत असून तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमधील सदर बाजारात ही मागणी तर तब्बल दहा पटीने वाढली आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचं नियोजन केलं आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

बाजारात तिरंग्याला मोठी मागणी

संपूर्ण देशभरात तिरंग्याची मागणी वाढल्याची चित्र आहे. दिल्लीमधील सदर बाजारात लोकांची तिरंगा खरेदीसाठी झुंबड उडत आहे. “तिरंग्याची मागणी दहापटीने वाढली आहे. इतर छपाईची कामं कऱणारेही इतर कामं सोडून फक्त तिरंग्याची छपाई करत आहेत,” अशी माहिती दुकानदाराने एएनआयशी बोलताना दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये नागरिकांची तिरंग्यासाठी झुंबड

कोलकातामध्येही तिरंग्याच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची घोषणा केल्यापासून तिरंग्याची मागणी दुपटीने वाढली आहे. मागणी इतकी आहे की, लोकांना परवडावं यासाठी आम्ही फक्त खादी आणि रेशीम न वापरता साधा कपडाही वापरत आहोत”. प्रचंड मागणी असल्याने आम्ही फक्त तिरंगाच तयार करत असल्याचंही एका दुकानदाराने सांगितलं आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानात महाराष्ट्र अव्वल राहील; एकनाथ शिंदे यांची ग्वाही

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्य हे देशात अव्वल राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या बैठकीत दिली आहे.

‘देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान देशातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी, अशी सूचना केली आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.