औरंगाबादेत म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड, महागड्या इंजेक्शनसह सर्व औषधी मोफत

0 4

औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होत आहे. याच कारणामुळे शहरातील घाटी रुग्णालयात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, असे असले तरी औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होताना दिसतेय. याच कारणामुळे शहरातील घाटी रुग्णालयात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या या वॉर्डची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज (10 जून) पाहणी केली. (district collector Sunil Chavan visited special ward of Mucormycosis patient created in Aurangabad government hospital )

सर्व महागडी इंजेक्शन्स मोफत मिळणार

औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच आहेत. सध्या घाटी रुग्णालयात एकूण 90 म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्णांवर उपचार केला जात आहे. या सर्व रुग्णांना महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध मोफत दिले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत सुमारे एक हजार म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 100 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

 

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे दर निश्चित

म्युकरमायकोसिस या आजारावर बोलताना राजेश टोपे यांनी 8 जून रोजी मोठी घोषणा केली होती. त्यांनी “म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे सांगितले होते. तसेच या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना याची खबरदारी घेण्यात यावी असे सांगत प्रत्येक दवाखान्यात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांनी याबाबत दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या.

काही खासगी रुग्णालयांची या आजारावर उपचार करण्यासाठी जनआरोग्य योजनेत नोंद झालेली नाही. मात्र, तरीही अशा खासगी रुग्णालयात या आजारावर रुग्ण उपचार घेत असेल तर या रुग्णालयांसाठीही उपचाराची दरनिश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून घेतली जाणार नाही, याचीही दक्षता घ्या असे निर्देशही त्यांनी दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.