राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे खाते उघडण्याच्या प्रक्रियेमुळे शिक्षकांचे वेतन रखडत न ठेवता वेतन प्रक्रिया तात्काळ करण्यात यावी.

महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष म.रा.शिक्षक सेना बुलडाणा

0 1

बुलडाणा :
शासन निर्णयानुसार शिक्षकांचे दरमहा वेतन एक तारखेला अदा करण्यात यावे असे सुस्पष्ट आदेश आहेत, त्या अनुषंगाने यापूर्वीचे मुख्यकार्यकारी अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शिक्षकांचे वेतन दरमहा विनाविलंब अदा करण्यासंदर्भात यापूर्वी परिपत्रक निर्गमित केलेले आहे, तरी सुद्धा शिक्षकांच्या वेतनाला दरमहा विलंब होतच आहे.

जिल्हयातील शिक्षकांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अद्याप पर्यंत रखडलेले असल्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. बॅंकेच्या व पतसंस्थेच्या व्याजाचाही भुर्दंड शिक्षकांना नाहक सोसावा लागत असुन विहित मुदतीमध्ये कर्ज हप्त्याची परतफेड होत नसल्यामुळे बॅकेच्यावतीने अतिरिक्त रक्कम विलंब शुल्क भरण्याचा फटका जिल्हयातील शिक्षकांना सहन करावा लागत असल्यामुळे शिक्षकांचे वेतन तात्काळ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) सचिन जगताप यांच्याकडे केलेली आहे.

डिसीपीएस धारक शिक्षकांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन ( एनपीएस ) योजनेअंतर्गत खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळे माहे मार्चच्या वेतनास विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आधी डिसीपीएस धारक शिक्षकांना कपात केलेल्या रक्कमेचा हिशोब द्या ,मगच राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे खाते उघडण्यासंदर्भात निर्णय घ्या.ही भुमीका गत दोन महिण्यापुर्वी शिक्षक सेनेच्यावतीने निवेदनामार्फत शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्याकडे करण्यात आलेली असता अद्यापपर्यंत डिसीपीएस धारक शिक्षकांना परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा कपाती झालेल्या रक्कमेचा हिशोब मिळालेला नाही.

माहे मार्चच्या वेतन पत्रकामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची कपात शुन्य दर्शवून जिल्हयातील शिक्षकांचे नियमीत वेतन अदा करण्यात यावे याकरिता तालुका स्तरावरुन वेतन देयके सादर करण्याची प्रक्रिया विनाविलंब करण्यासंदर्भात संबंधितांना आदेशित करण्यात यावे.

डिसीपीएस धारक शिक्षकांसह जिल्हयातील सर्व शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.
माहे मार्चचे वेतन ऑनलाईन देयके शालार्थ पोर्टलवर कार्यान्वित करतांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या डिसीपीएस धारक शिक्षकांची कपात होत नाही ही तांत्रिक समस्या फक्त एका जिल्हयापुरतीच मर्यादित नसून संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही समस्या उद्भवलेली आहे.

राज्य शासनाने शालार्थ वेबसाईटमध्ये ऑनलाइन वेतन पर्यायाप्रमाणे फक्त माहे फेब्रुवारी पर्यंतचीच डीसीपिएस शिक्षकांची कपात स्विकारण्यासंदर्भात पोर्टलवर प्रावधान असल्यामुळे तसेच शालार्थ कपाती व समप्रमाणात असलेल्या शासनाच्या हिश्श्याबद्दल तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे परंतू सदर समस्याचे निराकरण तात्काळ करून शिक्षकांचे वेतन अदा करण्यात यावे अशी मागणीही शिक्षक सेनेच्यावतीने करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.