वीज ग्राहक स्वतःहून पाठवू शकतात मीटर रीडिंग

महावितरणकडून साेय उपलब्ध; चार दिवसांची मुदत कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. ...

0 26

मुंबई : कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू असल्याने संचारबंदी आहे. अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांना मीटर रीडिंग पाठविता येईल. वीज ग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

केंद्रिकृत वीज बिल प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघु दाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची एसएमएसद्वारे विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप किंवा वेबसाइटद्वारे रीडिंग पाठविता येईल.

काय करावे?

१. ॲपमध्ये ‘सबमीट मीटर रीडिंंग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रीडिंग पाठवायचे आहे, तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा.

२. मीटर रीडिंग घेताना वीज मीटरच्या स्क्रीनवर तारीख व वेळेनंतर रीडिंगची संख्या व केडब्लूएच असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मॅन्युअली रीडिंग ॲपमध्ये नमूद करावे व सबमिट करावे.

३. मोबाइल ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर मीटर रीडिंग थेट सबमिट करता येईल. मात्र, गेस्ट म्हणून मीटर रीडिंग सबमिट करताना नोंदणीकृत मोबाइलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना वेबसाइटवरून फोटो व मीटर रीडिंग अपलोड करायचे आहे, त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगिन करणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.