कुलूप दुरुस्तीच्या बहाण्याने सहा लाखांचा गंडा

कुलूप दुरूस्तीचे काम शोधत फिरणाऱ्या दोघांना ज्योती यांनी कपाटाचे कुलूप दुरूस्त करण्यास सांगितले.

0

पुणे : कपाटाचे कुलूप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी लोखंडी स्क्रू आणण्यासाठी मालकिणीला घराबाहेर पाठवून तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करून गंडा घातला आहे. ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी (२६ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकरणी ज्योती रमेश कांबळे (वय ४२,रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कुलूप दुरूस्तीचे काम शोधत फिरणाऱ्या दोघांना ज्योती यांनी कपाटाचे कुलूप दुरूस्त करण्यास सांगितले. चोरट्यांनी कपाटाची किल्ली ताब्यात घेत लोखंडी स्क्रू आणण्यासाठी ज्योती यांना घराबाहेर पाठविले. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी छोटेखानी लॉकर तोडून त्यातील साडेतीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. काही वेळाने घरी परतलेल्या ज्योती यांना चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.