ऑलिम्पिक विजेत्यांवर भारताचे वर्चस्व!

अर्जेंटिनावर ३-० अशी मात करत चौथ्या स्थानी झेप

0 1

एफआयएच प्रो हॉकी लीग

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनावर दुसऱ्या सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवत ३-० असा विजय संपादन केला. एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.

हरमनप्रीत सिंग (११व्या मिनिटाला), ललित उपाध्याय (२५व्या मिनिटाला) आणि मनदीप सिंग (५८व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारताने आणखी तीन गुणांची कमाई केली. शनिवारी मध्यरात्री भारतीय संघाने निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर अर्जेंटिनावर पेनल्टी-शूटआऊटमध्ये ३-२ अशी सरशी साधली होती. भारताचे पुढील सामने ग्रेट ब्रिटनविरुद्ध ८ आणि ९ मे रोजी रंगणार आहेत. त्याआधी भारतीय संघ १३ आणि १४ एप्रिल रोजी अर्जेंटिनाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे.

भारताने आठ सामन्यांत १५ गुणांची कमाई केली असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचले आहेत. यजमान अर्जेंटिनाला १२ सामन्यांत ११ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. भारत, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ऑलिम्पिकसाठी एकाच गटात असल्याने भारताला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर भारताच्या अ गटात स्पेन, न्यूझीलंड आणि यजमान जपान यांचाही समावेश आहे.

अर्जेंटिनाने भारताच्या गोलक्षेत्रात अनेकदा मुसंडी मारत बचावपटूंवर दबाव आणला. पण ५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा गोलरक्षक कृष्णन पाठकने यजमानांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. ११व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवत हरमनप्रीतने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ललितने भारताची आघाडी २-० अशी वाढवली. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना मनदीप घसरून खाली पडला तरी त्याने चेंडूला गोलजाळ्यात ढकलत भारताला ३-० असा विजय मिळवून दिला.

आम्ही सुंदर बचावात्मक खेळ केला. अर्जेंटिना संघाचा बचाव भक्कम असला तरी आम्ही गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक विजेत्यांविरुद्ध गोल लगावले, ही चांगली बाब म्हणावी लागेल. बचाव आणि मधली फळी तसेच अनेक बाबतीत आम्ही मेहनत घेत आहोत. या सामन्यातूनही आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले.

– कृष्णन पाठक, भारताचा गोलरक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.