महाराष्ट्रावर पुन्हा आघात! ठाण्यातील रुग्णालयात अग्रितांडव; चार रुग्णांचा मृत्यू

दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णांनी गमावले प्राण

0 16

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते. आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं. तर इतर रुग्णांना सुटी देण्यात आली. या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आगीत रुग्णालयाचा पहिला मजला जळला असून, यात तीन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या रुग्णालयात करोना व्यतिरिक्त इतर व्याधी असणारे रुग्ण उपचार घेत होते. राज्यात मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात आग लागण्यासह इतर दुर्घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यातील घटनेपासून हे सत्र सुरू असून, नागपूरमध्ये एका रुग्णालयाला आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्यापाठोपाठ मुंबईतही आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नाशिकमध्येही ऑक्सिजनच्या टाकीला गळती लागल्याने २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.