महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मशिदीतून करोनाग्रस्तांसाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा

घरुन उपचार घेताना अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास या मशिदीतून मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

0 3
कोल्हापूर : संकटकाळात जात, धर्म आणि प्रांत यापेक्षा अनेकदा मानवता हाच धर्म महत्त्वाचा ठरतो. याचीच प्रचिती सध्या कोल्हापुरात येत आहे. ज्या मशिदीत मुस्लीम बांधव समाजाच्या आरोग्यासाठी दुवा मागतात, त्याच मशिदीतून सर्व धर्मीय बांधवांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. गृहअलगीकरणात असलेल्या करोनाग्रस्तांना याचा उपयोग होत असल्याने अनेकांचा प्राण वाचवण्यात मणेर मशिद आपला वाटा उचलत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात करोनाचा कहर झाला. दोन महिन्यातच तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील आत्तापर्यंतचा आकडा लाखावर पोहोचला आहे. रोज हजार ते दीड हजार रूग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. दवाखान्यातील बेड अपुरे पडत असल्याने अनेक स्वयंसेवी संस्थांनी कोविड उपचार सेंटर सुरू केले आहेत. तेदेखील कमी पडत असल्याने अनेकांवर घरातच उपचार सुरू आहेत.

करोना रोखण्यासाठी अनेकांना गृहअलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. अशा लोकांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास त्यांच्या मदतीला मणेश मशिदचे कार्यकर्ते धावून जात आहेत. मागेल त्याला मोफत ऑक्सिजनचा पुरवठा ते करत आहेत.

मशिदीमध्ये केवळ नमाजपठणच केले जात नाही, तर अनेक समाजउपयोगी उपक्रमही राबविले जातात. कोल्हापुरात मुस्लीम बैतुलमाल कमिटी तर करोनाग्रस्त मृतदेहांवर अत्यंस्कारही करते. यापुढे पाऊल टाकत आता करोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. या समाजातील शफिक मणेर यांचे एसी दुरूस्तीचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे ते सध्या बंद आहे. दुकानात वापरण्यात येणारे ऑक्सिजन सिलिंडर करोनाग्रस्तांना वापरता येते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा विचार समाजातील कार्यकर्ते हिदायत मणेर यांच्या निदर्शनास आणून दिली. हिदायत यांनी त्याला व्यापक रूप देण्याचे ठरविले. ज्यांच्याकडे असे सिलिंडर आहेत, त्यांनी मशिदीत आणून द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी ते आणून दिले. बघता बघता शंभर सिलिंडर मणेर मशिदीत जमा झाले.

कोल्हापुरातील सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या अठरा हजारावर आहे. त्यामध्ये गृहअलगीकरणात असलेल्यांची संख्या किमान सहा हजारावर आहे. त्यांना अचानक ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास या मशिदीतून मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. यासाठी पन्नास कार्यकर्त्यांची टीम चोवीस तास कार्यरत आहे. कुणीही फोन केला की हे सिलिंडर घरपोच केले जाते. आत्तापर्यंतच पाचशेपेक्षा अधिक करोनाग्रस्तांना याचा उपयोग झाला आहे. अतिशय गरजेच्या वेळी ऑक्सिजन मिळाल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. मशिदीतून दुवा देताना प्राणवायू देत प्राण वाचविण्याचा हा अनोखा उपक्रम सध्या कोल्हापुरात कौतुकाचा विषय झाला आहे.

या उपक्रमात शफीक मणेर, इम्रान मणेर, अमजद बागवान, इम्रान बागवान, जाकिर आत्तार, असीफ मोमीन, फय्याज आत्तार व हिदायत मणेर यांच्यासह ५० पेक्षा अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. केवळ कोल्हापूरच नव्हे तर सांगली, सातारा व बेळगाव जिल्ह्यातील काहीं रूग्णांना या कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन पुरवत जात, धर्माच्या पलीकडे जात सेवेचा प्रांतही ओलांडला आहे.

‘करोनाचा कहर सुरू असल्याने अनेकांचा ऑक्सिजनअभावी तडफडून जीव जात आहे. अशावेळी मानवता हाच धर्म मानत मणेर मशिदीने लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या आरोग्यासाठी दुवा मागतानाच दवाही देण्याचा आमचा हा उपक्रम आहे,’ असं सामाजिक कार्यकर्ते हिदायत मणेर यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.