Gold Silver Price | जाणून घ्या गुढीपाडव्याच्या दिवशी काय आहे सोन्या-चांदीचा भाव

Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 44,750 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,750 रुपये इतका आहे

0 0

मुंबई : गुढीपाडव्याचा सण खरेदीसाठी महत्वाचा मानला जातो. पण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यावर कोरोनाचे संकट आहे. गेले काही दिवस सातत्याने घसरण होत असलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती आता हळूहळू पुन्हा वाढताना दिसत आहेत. सोमवारी संध्याकाळी बाजार बंद होत असताना सोन्याच्या किंमतीत 40 रुपयांनी तर चांदीच्या किंमतीत 400 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार दिसत आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,750 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा  45,750 रुपये इतका आहे.

गेले काही दिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होतं असल्याचं पहायला मिळतंय. चांदीच्या दरात सोमवारच्या तुलनेत 400 रुपयांची वाढ झाली आहे. आज, मंगळवारी सकाळी हा दर 67,200 रुपये इतका आहे. सोमवारी सकाळी हा दर 66,900 रुपये इतका होता. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव हा 67,500 इतका होता, तर 31 मार्चला तो 65,500 रुपये इतका होता.

गेल्या दहा दिवसांचा विचार करता 5 एप्रिलला सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 290 रुपयांनी वाढली होती. त्यानंतर 8 एप्रिलला 250 रुपयांची वाढ झाली होती. अन्यथा त्या आधी इतर दिवशी सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाली आहे. 28 फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 45,930 रुपये इतका होता तर 31 मार्चला तो 44,370 रुपये इतका होता.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.