लग्नानंतर काही तासातच नवरदेवाचा मृत्यू, वरातीच्या गाडीतच सोडले प्राण

वरात घेऊन निघताच नवरदेवाचे निधन: ब्रह्मपुरी तालुक्यातील घटना

0 0

आवळगाव (चंद्रपूर): लग्न म्हणजे सात जन्मांचे बंधन. या बंधनात सामाजिक चालीरीतीनुसार माणूस विवाहबंधनात बांधला जाऊन संसाररूपी गाडा चालवतो. कधीकधी निसर्गनियमानुसार पती-पत्नी दोघेही एकमेकाला अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात, तर कोणी मध्येच साथ सोडतात.

अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगावात गुरुवारी घडली. लग्न लागले. वरातील जेवण झाले. नववधूला घेऊन नवरदेव वाहनात बसल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही क्षणांतच या घटनेने दोन्ही कुटुंबांसह वऱ्हाडीही हादरले. नाजूक अभिमन्यू पोहनकर असे मृत नवरदेवाचे नाव आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. नाजूक हे कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला वधुमंडपी पोहोचले.

सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आनंदाच्या वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाहसोहळा पार पडला. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान रीतिरिवाजानुसार नवरदेव नाजूक वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. अशातच अचानक नवरदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला.

ब्रह्मपुरीवरून आरमोरीला नेत असताना रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. ही वार्ता ऐकताच सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या दीपालीच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.