प्रा.आ.केंद्र भोनगावच्यावतीने मोबाईलच्या दुष्परिणाम विषयक कठोरा शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0

शेगांव : 
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा कठोरा येथे विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम विषयक वैद्यकीय अधिकारी ललित राठोड,आरोग्य सेविका पोटदुखे,एस.आर.भोंबळे,उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,आशावर्कर लताबाई कठोरकार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

या विषयासंदर्भात मोबाईल शिवाय आता कोणीच राहू शकत नाही. पूर्वी मोबाईल हा फक्त मोठ्या माणसांसाठी कामाची अशी वस्तू होती. पण आता ती अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. लहान मुलांच्या हातातही हल्ली मोबाईल फोन दिसू लागला आहे. खूप जणांना मोबाईल नसेल तर झोप लागत नाही.मोबाईलच्या जास्त अधीन गेल्यामुळे सामाजिक, शारिरीक व मानसिक दुष्परिणाम दिसून येत आहेत.

याप्रसंगी सतत मोबाईलवरील सोशल मीडियावर व्यस्त राहिल्यामुळे एकटेपणाची सवय जडते,मनोरंजक गेम्स,फेसबुक आदी बाबीमुळे निद्रानाश होतो,कोणत्याच कामात, अभ्यासात लक्ष लागत नाही,ऑनलाईन खरेदीची सवय झाल्यामुळे विनाकारण पैसे वाया जातात,वादग्रस्त विधाने,ऑनलाईन फसवणूक होत असल्यामुळे सायबर क्राईमचा धोका संभावतो,मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात,सेल्फीमुळे न्यूनगंड निर्माण होतो,जिवीत दुर्घटना घडतात,कार्पल टनलचा शरिरासंदर्भातील त्रास उद्भवतो,मोबाईलच्या किरणामुळे कर्करोगाचा संभाव्य धोका उद्भवू शकतो,एकाकीपणामुळे डिप्रेशनची समस्या उद्भवते आदी बाबीवर वैद्यकीय अधिकारी डॉ.ललित राठोड यांनी सखोल माहीती विद्यार्थ्यांना सांगीतली.

मोबाईलच्या अति वापराची सवय टाळण्यासाठी वाचनाची सवय लावणे,मैदानी खेळ खेळणे,फिरायला जाणे,नृत्य क्लास आदी बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचा विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांनी सल्ला दिला.

याप्रसंगी शिक्षक सुरेश डोसे,संजय महाले,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.