तासाभराच्या पावसाने आपत्ती व्यवस्थापन ‘पाण्यात’!

उन्मळून पडलेली झाडे उचलताना कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणचे रस्ते तास दीड तास बंद ठेवावे लागले.

0 1

झाडे कोसळली, रस्तेही बंद; निचरा न झाल्याने नाल्या तुंबल्या

नागपूर : शहरात केवळ एका तासाच्या वादळी पावसाने महापालिके च्या पावसाळापूर्व नियोजनाचे तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे पितळ उघडे पाडले. शहरात एकाचवेळी अनेक ठिकाणी पडलेली झाडे उचलताना आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरवर्षी महापालिकेकडून पावसाळा पूर्व नियोजन के ले जाते. यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात कशी करायची याचे नियोजन के ले जाते. यंदाही ते करण्यात आले, यंत्रणा सज्जतेचा दावा करण्यात आला. मात्र मंगळवारी दुपारी एक तास झालेल्या वादळी पावसाने सर्व नियोजन फोल ठरल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी दिसून आले. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावरच तुंबले. पश्चिम व दक्षिण पश्चिम भागाला वादळाचा जोरात तडाखा बसला. उन्मळून पडलेली झाडे उचलताना कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणचे रस्ते तास दीड तास बंद ठेवावे लागले.

तीन दिवसापूर्वी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थान विभागाची बैठक झाली होती. विविध विभागातील अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली होती. मात्र वादळामुळे झालेल्या पडझडीतून सावरण्यासाठी यंत्रणेला बराच उशीर लागला. नियंत्रण कक्षात फोन लागत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती.

पडलेली झाडे उचलणे, खोळंबलेली वाहतूक सुरळीत करणे, साचलले पाणी बाहेर काढणे यासाठी १० पथक तयार करण्यात आले. मात्र, पाऊस थांबल्यावरही पथकाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. कर्मचाऱ्यांकडे साधनांचीही कमतरता होती. झाडे कापण्यासाठी, ते बाजूला करण्यासाठी विलंब  होत होता. माटे चौकात पेट्रोल पंपापुढील  झाडे बाजूला करण्यासाठी क्रेन अर्धा तास  उशिरा पोहचली.

नियंत्रण कक्षात संपर्क  साधा

येत्या काही दिवसात शहरात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता महापालिकेत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ असा राहील. आपत्कालीन कक्ष, सिव्हिल मुख्यालय अग्निशमन केंद्र येथील दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५४०२९९, ०७१२-२५४०१८८, १०१, १०८ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ७०३०९७२२०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.