buldhana News : शेतकरी उपाशी अन् अधिकारी तुपाशी, बुलडाण्यात कृषी अधिकाऱ्यांचा धक्कादायक प्रताप

या संपूर्ण घोळामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती नसताना खाजगी कंपन्यांकडून महाग बियाणं खरेदी करावं लागत आहे.

0 5

बुलडाणा, 09 जून:  राज्यात मान्सून (Maharashtra rain) दाखल झाला आहे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  अशात शेतकरी (Farmers) पेरणीच्या तयारीला लागलाय. शेतकरी बियाणे, खतं यांची जुळवाजुळव करताना पाहायला मिळत आहे. मात्र बुलडाण्यात कृषी अधिकाऱ्यांच्या (agricultural officers) हलगर्जीपणामुळे बियाणे महामंडळाकडून कमी दरात बियाणं मिळवण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे बियाणांचा साठा असल्याची एक यादीच कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे बियाणं नसतानाही त्यांची नावं या यादीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच संतापले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यामधील घाटावर अनेक शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेत असतात. दरवर्षी बियाणे महामंडळ या शेतकऱ्यांना हे बियाणं स्वस्त दरात उपलब्ध करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडतं. मात्र या वर्षी महामंडळाचे बियाणं बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांना बियाणे का मिळाला नाही याचा जेव्हा आम्ही तपास करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या हाती कृषी विभागाने प्रसिद्ध केलेली एक यादी लागली. ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात बियाणांचा साठा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. परंतु, याबाबत शेतकऱ्यांना विचारले असता आमच्याकडे तर बियाणेच उपलब्ध नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी या शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांकडून चढ्या दराने बियाणं खरेदी करावं लागत आहे.

त्यामुळे कृषी विभागाने बनवलेली ही यादी खरी की खोटी हे अधिकाऱ्यांना विचारले असता ही यादी आम्हीच बनवलेली असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी  नरेंद्र नाईक यांनी सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणात कृषी विभागाचा एकही कर्मचारी आमच्याकडे विचारणी करण्यासाठी आला नसताना केवळ कागदी घोडे नाचवत या कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, तयार केलेल्या या यादीमध्ये काही शेतकऱ्यांकडे केवळ 2 एकर शेती असताना त्यांच्याकडे या यादीनुसार तब्बल 24 ते 25 क्विंटल बियाणं उपलब्ध असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

या संपूर्ण घोळामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती नसताना खाजगी कंपन्यांकडून महाग बियाणं खरेदी करावं लागत आहे. सरकारकडून पगार घेणाऱ्या या कृषी विभागाच्या अक्षम्य चुकीमुळे बुलडाणा जिल्ह्यातली नाहक बळी ठरला जात आहे. याकडे कुणी लक्ष देईल का हा सवाल उपस्थितीत झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.