रास्त धान्य दुकानामधून दारू विक्रीचा प्रकार उघड

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या दुकानावर छापा टाकत शुक्रवारी कारवाई केली.

0 33

कराड : करोनाच्या पार्श्वभूमीवरील टाळेबंदीमुळे दारूविक्रीची दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींमध्येही मोठी अस्वस्थता आहे. याचाच गैरफायदा घेत येथे चक्क शासनमान्य स्वस्त धान्य दुकानामधूनच काळय़ाबाजाराने देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे केलेल्या या कारवाईत देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला असून एकास अटक केली आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य सेवा आणि वस्तूंची दुकाने, व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील मद्यविक्रीची दुकानेही सध्या बंद झाली आहेत. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या या बंदीमुळे मद्यप्रेमींमध्येही मोठी अस्वस्थता पसरली आहे. याचाच गैरफायदा घेत कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील या स्वस्त धान्य दुकानातून देशी-विदेशी दारूची विक्री केली जात होती. स्वस्त धान्य वस्तूंचे दुकान असल्याने त्यातून होणाऱ्या व्यवहारांबाबत संशय न आल्याने हा व्यवहार छुप्या पद्धतीने सुरू होता.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या दुकानावर छापा टाकत शुक्रवारी कारवाई केली. या वेळी एका वाहनासह देशी-विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. तसेच या प्रकरणी उमेश एकनाथ जाधव (५५, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) यास अटक केली आहे. हे रास्त धान्य दुकान उमेश जाधव यांच्या आईच्या नावाने शासन दरबारी नोंदणीकृत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे यापुढे अत्यावश्यक सेवेतील दुकानातून होणाऱ्या व्यवहारांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.